वैजापूर न.प.साठी ६८.८० टक्के शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:03 AM2018-04-07T00:03:27+5:302018-04-07T00:04:18+5:30
उन्हामुळे टक्का घटला : रात्री आठ वाजेपर्यंत चालली मतदान प्रक्रिया
उन्हामुळे टक्का घटला : रात्री आठ वाजेपर्यंत चालली मतदान प्रक्रिया
वैजापूर : वैजापूर नगरपालिकेसाठी शुक्रवारी ६८.८० टक्के शांततेत मतदान झाले. मतदानादरम्यान किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या २३ जागांसाठी हे मतदान घेण्यात आले. उन्हामुळे मतदानाचा टक्का घटल्याने सर्वच उमेदवारांना चिंता लागली आहे.
या निवडणुकीचे निरीक्षक अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी विविध मतदान कें द्रांना भेटी देऊन पाहणी केली. नगरपालिकेसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. येथे एकूण ३८,३२४ मतदार आहेत. काही केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्या. दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास ३५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. निवडणूक विभागातून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५३.८० टक्के मतदान झाल्याची नोंद झाली होती. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाचा वेग वाढल्याने रात्री आठ वाजेपर्यंत मतदान झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान यंत्रे पंचायत समिती कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानाच्या वेळी मोंढा परिसरातील सहायक निबंधक कार्यालय, बाजार समिती, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, अध्यापक विद्यालय, जिल्हा परिषद मुलांची शाळा, स्वामी समर्थ विद्यालय येथील केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली.
१२ एप्रिल रोजी निकाल
यातील काही केंद्रांवर साडेपाच वाजेनंतरसुद्धा मतदानाची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. खा. चंद्रकांत खैरे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार आर. एम. वाणी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर, ऋषिकेश खैरे आदींसह अनेक पदाधिकारी शहरात होते. मुंबईत भाजपचा मोठा कार्यक्रम असल्याने सर्व मोठे नेते तेथे गेल्याने इकडे भाजपचे नेते दिसले नाहीत. १२ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
या प्रभागात झाल्या काट्याच्या लढती
नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे शिल्पा दिनेश परदेशी व शिवसेनेतर्फे साबेरखान यांची सून पाशपा अजहर अली यांच्यात काट्याची टक्कर झाली. सकाळपासूनच केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. कडक पोलीस बंदोबस्तही होता, सावित्रीबाई फुले विद्यालय, संत गाडगे महाराज विद्यालय, जि.प. प्रशाला मतदान केंद्र, डी. एड. कॉलेज व कन्या प्रशाला येथे सर्वाधिक मतदान झाले. दोन नंबर प्रभागमध्ये राष्ट्रवादीचे जाफर शेख, तर शिवसेनेतर्फे रियाज शेख यांच्यात एकेका मतदानासाठी टक्कर दिसली. पाच नंबर प्रभागामध्ये साबेरखान (शिवसेना), तर भाजपतर्फे गौरव दौडे आहेत, तसेच सात नंबर प्रभागमध्ये माजी आमदार आर.एम. वाणी यांचा मुलगा सचिन वाणी व भाजपचे शैलेश चव्हाण यांच्यात लढत आहे. प्रकाश चव्हाण (शिवसेना) व दशरथ बनकर (भाजप) यांच्यात तुल्यबळ लढती बघायला मिळाल्या.