विद्यापीठ अधिसभा पदवीधर गटाच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात; सकाळचे सत्र संथ
By योगेश पायघन | Published: November 26, 2022 12:08 PM2022-11-26T12:08:31+5:302022-11-26T12:09:18+5:30
विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यात ५१ केंद्रातील ८२ बूथवर ५३ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे.
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवीधर गटातील अधिसभेच्या १० जागांसाठी ४ जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात मतदारांचा मतदानाला तुरळक प्रतिसाद दिसत आहे. केंद्राबाहेर बुथवर गर्दी तर मतदान केंद्रात शुकशुकाट अशी स्थिती आहे. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यात ५१ केंद्रातील ८२ बूथवर ५३ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी एकूण ३६ हजार ६८२ मतदार आहेत. कुलगुरू डॉ प्रमोद येवले, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, बेगमपूराचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार हे विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या मतदान केंद्रावर लक्ष ठेवून आहेत.
निवडणूक विभागात वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपले नाव, नोंदणीक्रमांक टाकल्यास मतदारांना केंद्र समजणार आहे. मतदान केंद्राबाहेर उत्कर्ष, विद्यापीठ विकास मंच, परिवर्तन पॅनल ने बूथ लावले असून उमेदवार, मतदान प्रतिनिधी, राजकीय नेतेमंडळी हजेरी लावून मतदानाची परिस्थिती जाणून घेत आहे. तर फोन करून मतदानाला या म्हणून मतदारांना विनंती करण्यात येत आहे.या निवडणुकीत मतदारांना प्राधान्यक्रम लिहून मतदान करायचे आहे. ते कसे करावे हेही समजवण्यात केंद्रावरील कार्यकर्ते व्यस्त आहेत.
५३ उमेदवार रिंगणात
खुल्या प्रवर्गासाठी ५ जागांसाठी २९ उमेदवारांची पांढऱ्या रंगाची मतपत्रिका आहे. राखीव गटातून प्रत्येकी एका जागेसाठी अनुसूचित जातीसाठी फिकट निळ्या रंगात ७ उमेदवारांची मतपत्रिका आहे. अनुसूचित जमातीसाठी पिस्ता रंगात ४ उमेदवारांची मतपत्रिका, भटके विमुक्त जाती-जमातीच्या ५ उमेदवारांसाठी फिकट हिरव्या रंगाची मतपत्रिका आहे. इतर मागास वर्गासाठी फिकट पिवळ्या रंगाच्या मतपत्रिका असूनमहिला गटासाठी फिकट गुलाबी रंगाची मतपत्रिका आहे. दोन्ही गटात प्रत्येकी चार उमेदवार आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात १६ केंद्रावर १७, ७६५ मतदार, बीड जिल्ह्यात १६ केंद्रावर १२,५९३ मतदार, जालना जिल्ह्यात ९ केंद्रावर ३,९९३ मतदार, उस्मानाबाद १० केंद्रावर २,५३१ मतदार आहेत.