व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलने रस्ता खोळंबला; संयम सुटल्याने कर्कश हॉर्न वाजवून नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:53 IST2025-04-19T11:51:24+5:302025-04-19T11:53:20+5:30

सेव्हनहील ते सिडको बसस्थानक रस्ता पाच तास खोळंबला; ताफा निघत असतानाही रुग्णवाहिका सोडण्याचा पोलिसांचा निर्णय

VVIP protocol blocked the road; citizens expressed their anger by honking their horns loudly as they lost their patience | व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलने रस्ता खोळंबला; संयम सुटल्याने कर्कश हॉर्न वाजवून नागरिकांचा संताप

व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलने रस्ता खोळंबला; संयम सुटल्याने कर्कश हॉर्न वाजवून नागरिकांचा संताप

छत्रपती संभाजीनगर : शुक्रवारी सायंकाळी शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनामुळे शहरवासीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी ४ ते रात्री ९ दरम्यान सेव्हनहील ते सिडको चौकादरम्यान वाहनचालकांना ताटकळत उभे राहावे लागले. मंत्र्यांचा ताफा गेल्यानंतरही बराच वेळ उभे केल्याने मात्र २ वेळेस नागरिकांनी कर्कश हॉर्न वाजवणे सुरू केले. यातून त्यांनी संताप व्यक्त केला.

शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शहरात दाखल झाले. त्यांच्यासह राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराणा प्रताप यांचे वंशज लक्ष्यराज सिंह, पालकमंत्री संजय शिरसाठ, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांची देखील उपस्थिती होती. ६.१५ वाजेच्या सुमारास राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस यांचा ताफा कॅनाॅटच्या दिशेने निघाला. त्या दरम्यान दोन वेळेस वाहतूक अडवण्यात आली.

विदेशी नागरिकांनाही पडला प्रश्न
हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे अति महत्त्वाच्या व्यक्तींचा थांबा होता. त्यामुळे दुपारी ४.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत ६ वेळेस वाहतूक थांबवण्यात आली. शहरात आलेले पर्यटकही यात अडकले. सेव्हनहील येथेच वाहने सोडून ते पायी हॉटेलच्या दिशेने निघाले. मात्र, अति महत्त्वाच्या व्यक्तींमुळे सामान्यांना थांबवण्यात आल्याचे समजताच अचंबित होऊन त्यांनी मोबाईल मध्ये हे दृश्य कैद केले.

दोरी लावून रस्ता अडवला
वाहन चालकांना थांबण्यास सांगितल्यानंतरही अनेकदा वाहनचालक वाहने पुढे दामटतात. यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजूने जाड दाेरी बांधून वाहने अडवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, ६ वाजता सिंह व फडणवीस यांचा ताफा निघण्याच्या वेळेसच हायकोर्टाच्या विरुद्ध दिशेला वाहतूक थांबवली होती. त्यात गंभीर रुग्ण असलेली रुग्णवाहिका अडकली. पोलिसांनी तत्परता दाखवत रुग्णवाहिकेला मार्ग करुन दिला.

Web Title: VVIP protocol blocked the road; citizens expressed their anger by honking their horns loudly as they lost their patience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.