वडगाववासीयांची पाण्यासाठी भटकंती थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:20 PM2019-03-22T22:20:21+5:302019-03-22T22:20:33+5:30
पुरेसा निधी उपलब्ध असतानाही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे वर्षभरापासून गावाचा पाणी प्रश्न रेंगाळला आहे.
वाळूज महानगर : पुरेसा निधी उपलब्ध असतानाही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे वर्षभरापासून गावाचा पाणी प्रश्न रेंगाळला आहे. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांना पाणी असूनही भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अनेक वर्षांपासून वडगावात पाण्याची समस्या आहे. पाणीटंचाईमुळे दरवर्षी वर्षातील सहा महिने, तर नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. गावाचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी तत्कालीन सरपंच महेश भोंडवे यांनी एमआयडीसीचे पाणी घेण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसी जलकुंभ ते वडगाव जलकुंभ जवळपास दीड कोटी रुपये खर्चाची पाईपलाईन टाकून एमआयडीसीचे शुद्ध पाणी गावात आणले. त्यानंतर अंतर्गत लोखंडी पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव तयार करून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधीही मंजूर के ला. सदरील कामाची निविदा काढून हे काम वर्षभरापूर्वी एका खाजगी संस्थेला दिले; परंतु ठेकेदार आणि पदाधिकारी यांच्यातील वादात कामाला गती मिळाली नाही. मध्यंतरी ग्रामपंचायतीने सदरील काम रद्द करण्याचा ठराव घेतला.
या कामासाठी नवीन प्रस्ताव तयार करून निविदा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजून ग्रामपंचायतीकडून अंदाजपत्रकच बनविण्याचे काम सुरू आहे. पाण्यासाठी सुरू असलेली ग्रामस्थांची भटकंती कधी थांबेल, असा प्रश्न रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे. याविषयी सरपंच उषा साळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एमआयडीसीकडूनच कमी पाणी येत आहे. वाढीव पाण्यासाठी त्यांना पत्र दिले आहे. लवकरच नवीन निविदा काढून अंतर्गत पाईपलाइचे काम सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.