एनटीबीच्या अडीच टक्के आरक्षणापासून वैदू समाज कोसो दूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 07:33 PM2018-02-09T19:33:31+5:302018-02-09T19:34:51+5:30
एनटीबीच्या अडीच टक्के आरक्षणापासून वैदू समाज कोसो दूर आहे. या समाजातही शिक्षणाचे प्रमाण नसल्यागतच आहे. वैदू समाजाच्या महिला तर शिक्षणापासून लांबच लांब आहेत.
- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : एनटीबीच्या अडीच टक्के आरक्षणापासून वैदू समाज कोसो दूर आहे. या समाजातही शिक्षणाचे प्रमाण नसल्यागतच आहे. वैदू समाजाच्या महिला तर शिक्षणापासून लांबच लांब आहेत. अद्यापही भटकंती पाचवीलाच पुजलेली आहे. उदरनिर्वाहासाठी पारंपरिक व्यवसाय हातातून निसटला आहे. त्यावर कधीच दुसर्यांचे अतिक्रमण झाले आहे. अडीच टक्के आरक्षणात २८ जाती येत असल्यामुळे वैदू समाजाच्या वाट्याला अद्याप तरी काही आलेले नाही.
लोकमतच्या बिरादरी सदरात चर्चा करताना हे भयान सत्य बाहेर आले. औरंगाबादेत या समाजाची भारतनगर, गारखेडा, सातारा परिसर या भागात घरे आहेत. देशात हा समाज आंध्र आणि महाराष्ट्रातच आहे. खरे तर हा समाज जुन्या काळातला डॉक्टरच. जडीबुटी विकणे हा मूळ व्यवसाय. आता तो त्यांचा राहिलेला नाही. पुढे वैदू समाजाची पुरुष मंडळी डबे, चाळण्या, कोट्या तयार करून विकू लागली. महिला बिबे, सुया विकू लागल्या. कालांतराने हे कामही बंद पडत गेले. प्रसंगी भीक मागून उदरनिर्वाह करण्यापलीकडे या समाजाच्या हातात काहीच राहिले नाही.
आई तुळजा भवानी व यलम्मांना मानणारा या समाजात पूर्वी जात पंचायत चालायची. आता ती संपुष्टात आली आहे. आजही पाल करून राहावे लागते. त्यामुळे वैदू समाजाच्या मुला-मुलींनी शिकावे कसे हा प्रश्न आहे, याकडे महाराष्ट्र वैदू समाज संघटनेचे अध्यक्ष दुर्गादास गुडे, उपाध्यक्ष दुर्गादास शिवरकर, गंगाराम शेवाळे, शिवा शेवाळे आदींनी लक्ष वेधले. आतापर्यंत या समाजात दुर्गादास गुडे व दुर्गादास शिवरकर हे दोघेच बर्यापैकी शिकलेले.
साधे मॅट्रिक उत्तीर्ण विद्यार्थीही सापडणार नाहीत. शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी वैदू समाजासाठी वसतिगृहे उघडण्यात यावीत, मुला-मुलींना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, वैदू समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड नाही, ते पालांवर येऊन देण्यात यावेत, आदिवासी समाजाच्या सवलती वैदू समाजाला देण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी गुढे यांच्यासह टी.एस. चव्हाण, के. ओ. गि-हे, प्रकाश वाघमारे, दत्ता शिंदे आदींनी केल्या. दुर्गादास गुढे यांनी सांगितले, हळूहळू आम्ही समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. समाज छोटा आहे. आजही तो रुढी-परंपरा व अंधश्रद्धेच्या गर्तेत आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा समाजात रुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. दिवंगत आसाराम गुरुजींनीही त्याकाळी असेच खूप प्रयत्न केले होते.