दुष्काळात केलेल्या कामाची मजुरी ‘मस्टर’वरच
By Admin | Published: June 30, 2016 12:59 AM2016-06-30T00:59:46+5:302016-06-30T01:26:09+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर कामाला गेलेल्या मजुरांची मजुरी ‘मस्टर’वरच आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर कामाला गेलेल्या मजुरांची मजुरी ‘मस्टर’वरच आहे. २५ कोटी रुपयांच्या आसपास कुशल आणि अकुशल स्वरुपाची मजुरी देणे बाकी आहे. यंदाच्या दुष्काळात मराठवाड्यात रोहयो मजुरांचा आकडा दोन लाखांवर गेला होता. योजनेवर २२४ कोटींचा खर्च झाल्याचे प्रशासन सांगते आहे.
२०१५-१६ यावर्षात मजुरांनी दुष्काळात केलेल्या कामांची रक्कम प्रशासन कधी अदा करणार असा प्रश्न आहे. मजुरांच्या खाते क्रमांकात त्रुटी, इंटरनेट बंद, खाते क्रमांक न जुळणे आदी कारणांवरून मंजुरी अदा करण्यात आली नसल्याची कारणे प्रशासन पुढे करीत आहे. मजुरीच जर वेळेत मिळत नसेल तर हमी योजना कशासाठी, असा प्रश्न आहे.
दुष्काळात बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी प्रशासनाने रोहयोची कामे उपलब्ध करून दिली असली तरी अत्यल्प मजुरीमुळे योजनेच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरविली होती. काही जिल्ह्यांतील मजुरांचे स्थलांतरदेखील झाले होते.
औरंगाबाद विभागात २०१६-१७ मध्ये अकुशल मजुरीवर १५२ कोटी ८७ लाख तर ६२ कोटी ४५ लाख रुपये कुशल मजुरीवर, असा एकूण २२४ कोटी ९ लाख रुपये खर्च झाला आहे. प्रशासनाचे पुढे अफाट मागे सपाट या पद्धतीने सिस्टीम राबविली. त्यामुळे मागील वर्षाचे अकुशलचे ९ कोटी ५२ लाख तर कुशलचे १६ कोटी, असे एकूण २५ कोटी रुपये अदा करण्यात आलेले नाहीत.