वर्कआॅर्डर देऊनही कोट्यवधींचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:30 AM2017-09-30T00:30:28+5:302017-09-30T00:30:28+5:30
शहरातील सध्याचे पथदिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिकेने १२० कोटी रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराला कार्यारंभ (वर्कआॅर्डर) आदेश दिल्यानंतरही पथदिव्यांच्या कामावर मनपाच्या तिजोरीतून खर्च होतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील सध्याचे पथदिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिकेने १२० कोटी रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराला कार्यारंभ (वर्कआॅर्डर) आदेश दिल्यानंतरही पथदिव्यांच्या कामावर मनपाच्या तिजोरीतून खर्च होतो आहे.
पालिकेच्या निधीतून कोट्यवधी रुपयांची कामे करून उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. सभापती गजानन बारवाल यांनी १२० कोटींच्या निविदेत कोणकोणत्या कामांचा समावेश आहे, याचा अभ्यास करून बैठकीत माहिती देण्याच्या सूचना अधिका-यांनी केल्या.
बैठकीत एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाचा प्रारंभ केव्हा होणार आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही काम सुरू करण्यास विलंब का करण्यात येत आहे. याचा खुलासा करण्याची मागणी सदस्य राजू वैद्य यांनी केली. निविदेतील तरतुदीनुसार स्क्रो खाते सुरू करणे गरजेचे आहे. त्यानुसार लेखा विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करीत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांनी दिली. त्यावर मुख्य लेखाधिकारी आर. एम. सोळुंके यांनीदेखील याबाबतची कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
१२० कोटींची कामे शहरात होणार असतील तर वॉर्डांतर्गत निविदा काढून विद्युत विभाग कोट्यवधी रुपयांची कामे का करीत आहे. ही उधळपट्टी बंद करण्यात यावी, अशी मागणी वैद्य यांनी केली.