मदतीची वाट पाहिली शेवटी इंजेक्शनसाठी महिलेने भीक मागून जमा केले ३०० रुपये
By संतोष हिरेमठ | Published: September 8, 2023 02:59 PM2023-09-08T14:59:18+5:302023-09-08T15:00:20+5:30
दोन दिवस मदतीची पाहिली वाट, शेवटी लोकांकडे मागितले पैसे
छत्रपती संभाजीनगर : पतीच्या सिटी स्कॅनसाठी लागणाऱ्या इंजेक्शनसाठी घाटी परिसरात लोकांकडून भीक मागून ३०० रुपये जमविल्याची घटना बुधवारी घडली. ही बाब सामाजिक कार्यकर्त्याच्या निदर्शनास पडताच त्यांनी या महिलेच्या मदतीसाठी धाव घेऊन लागणारे इंजेक्शन आणून दिले.
शेख सलिमा (रा. रोशनगेट) असे घाटी परिसरात लोकांकडे पैसे मागून ३०० रुपये जमा करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पती खलील शेख इब्राहिम यांचे सिटी स्कॅन करण्यासाठी आवश्यक इंजेक्शनसाठी १,२०० रुपये लागणार होते. परंतु, पैसे नसल्यामुळे गेले दोन दिवस त्या घाटीतील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात चकरा मारत होत्या. मदत मिळत नसल्याने बुधवारी त्यांनी थेट घाटीत लोकांकडे मदत मागण्यास सुरुवात केली. महिलेची परिस्थिती पाहून काहींनी पैसे दिले. असे ३०० रुपये जमा झाले. हा प्रकार के. के. ग्रुपचे किशोर वाघमारे यांच्या निदर्शनास पडला. तेव्हा ते तत्काळ या महिलेच्या मदतीसाठी धावून गेले आणि इंजेक्शन आणून दिले.
वैद्यकीय अधीक्षक म्हणाले...
वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय कल्याणकर म्हणाले, आम्ही अशावेळी आमच्या सोशल वर्कर्सला माहिती देतो. सोशल वर्कर्स डोनर्सच्या माध्यमातून मदत करतात.
एकीकडे मोफत, दुसरीकडे...
जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅनसह अनेक तपासण्या मोफत आहेत. येथे नोंदणी शुल्कही लागत नाही, तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या घाटीत नोंदणी शुल्कापासून विविध तपासण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.