दोन तास थांबले, नंतर मध्यरात्री मी भेटलो; मुंडे-कराड भेटीविषयी मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:11 IST2025-02-03T13:51:42+5:302025-02-03T14:11:39+5:30
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडेंसोबत झालेल्या भेटीबाबत गौप्यस्फोट केला आहे.

दोन तास थांबले, नंतर मध्यरात्री मी भेटलो; मुंडे-कराड भेटीविषयी मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट
Manoj Jarange Patil: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पीकविम्यासह कथित हार्वेस्टर घोटाळ्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून टीकेचे धनी होत आहेत. अशातच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हार्वेस्टर खरेदीसाठी पैसे दिलेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर बोलताना धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेल्या भेटीबाबतही गौप्यस्फोट केला आहे.
"विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे यांच्याकडून मला ७ ते ८ दिवस भेटीसाठी निरोप येत होता. माझ्याकडे गर्दी असल्याने दोन-तीन वेळा ते अर्ध्या वाटेतून माघारीही गेले होते. त्यानंतर एक दिवस ते रात्री दोन वाजता अंतरवालीला आले. त्यावेळी मी सर्व लोकांना भेटून झोपलो होतो. मात्र एक-दोन तास झाले तरी ते काही तिथून गेले नाहीत. त्यामुळे आमच्या लोकांनी मला झोपेतून उठवलं आणि सांगितलं की तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही, असं धनंजय मुंडेंकडून सांगण्यात आलं आहे. आपण तर सन्मान करणारे लोक आहोत, जातीयवादी लोक नाहीत. त्यामुळे मग मी त्यांना भेटलो. त्यावेळी वाल्मीक कराडही त्यांच्यासोबत होता," अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.
हार्वेस्टर घोटाळ्याविषयी काय म्हणाले मनोज जरांगे?
हार्वेस्टर खरेदीच्या नावाखाली फसवणूक झालेले शेतकरी माझ्याकडे आल्यानंतर मी धनंजय मुंडे यांच्या जवळच्या व्यक्तीला फोन करून जाब विचारला होता, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. "मी नारायणगडावर असताना हार्वेस्टरसाठी कोणाला तरी पैसे दिलेले शेतकरी माझ्याकडे आले होते. त्या शेतकऱ्यांना आधी मारहाणही झाली होती. त्यांनी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचं नाव मला सांगितलं. त्यानुसार मी धनंजय मुंडे यांच्या गेवराईतील कार्यकर्त्याला फोन लावला आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जावा, असं सांगितलं. त्यानंतर त्या शेतकऱ्यांना परळीत बोलावून घेण्यात आलं होतं," असं जरांगे यांनी म्हटलं आहे.