नव्या रेल्वे प्रकल्पांबाबत मराठवाड्याच्या पदरी पुन्हा ‘वेटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:14 PM2020-02-06T12:14:22+5:302020-02-06T12:16:00+5:30
रेल्वे प्रश्नांना खोडा : दौलताबाद- चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव नवीन रेल्वे मार्ग, परभणी-मनमाड दुहेरीकरणाचा विसर
औरंगाबाद : अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पाचव्या दिवशी बुधवारी रेल्वेचे पिंक बुक जाहीर झाले. सध्या सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांना तुंटपुज्या निधीशिवाय मराठवाड्याच्या पदरी फारसे काही पडले नाही.
प्रस्तावित दौलताबाद- चाळीसगाव रेल्वेमार्ग आणि रोटेगाव- कोपरगाव रेल्वेमार्गासाठी निधी मिळाला नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील ८१.४३ कि.मी.च्या परभणी- मुदखेडदरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आहे. या दुहेरीकरणासाठी ७५ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
परभणी- मनमाड रेल्वेमार्ग दुहेरीकरर्णाचाही अर्थसंकल्पात विचार केला नाही. औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड, तिरुपती रेल्वेस्टेशनचा पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने विकास केला जाणार आहे. या चार स्टेशनसाठी १ कोटी ४६ लाख ५० हजारांचा निधी देण्यात आला. त्यामुळे एवढ्या निधीत त्यांचा कसा विकास होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनमाड- औरंगाबाद रेल्वेमार्गाच्या नूतनीकरणासाठी दोन वर्षांपासून निधीच देण्यात आलेला नाही. औरंगाबादेत पीटलाईनच्या मागणीचाही विचार केलेला नाही.
मनमाड- मुदखेड- धोन विद्युतीकरणास : 50,00,00,000
मनमाड- मुदखेड- धोन या ८६८ किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी ५० कोटींची तरतूद केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्याप प्रतीक्षा आहे.
सोलापूर- उस्मानाबाद- तुळजापूरसाठी : 1,00,00,000
सोलापूर- उस्मानाबाद- तुळजापूर या नव्या रेल्वेमार्गासाठी अवघ्या १ कोटीची तरतूद करण्यात आली. यातूनही केवळ सर्वेक्षणच होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पातून मराठवाड्याला काहीही मिळाले नाही. त्यामुळे एक वर्ष वाया गेले आहे. प्रशासनाने अर्थसंकल्पासाठी वेळीच मागण्या पाठविल्या नाहीत. त्यामुळे ही वेळ ओढावली.
- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वेविकास समिती
मराठवाड्यात रेल्वे प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
रेल्वेस्टेशनच्या इमारतीसाठीही समाधानकारक निधी मिळाला नाही. दुहेरीकरणाचा उल्लेखही नाही.
- राजकुमार सोमाणी, रेल्वे प्रवासी सेना