अँकर प्रोजेक्टची प्रतीक्षा; डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्याचे भूसंपादन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:02 PM2020-08-25T16:02:21+5:302020-08-25T16:07:27+5:30

‘डीएमआयसी’साठी अंतर्गत शेंद्रा आणि बिडकीन पट्ट्यात आतापर्यंत १० हजार एकर भूसंपादन केले आहे.

Waiting for the anchor project; DMIC's second phase of land acquisition stalled | अँकर प्रोजेक्टची प्रतीक्षा; डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्याचे भूसंपादन रखडले

अँकर प्रोजेक्टची प्रतीक्षा; डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्याचे भूसंपादन रखडले

googlenewsNext
ठळक मुद्देदहा हजार एकर क्षेत्राचे भूसंपादनबिडकीनमध्ये अद्याप अँकर प्रोजेक्ट नाही 

- विजय सरवदे

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधील (डीएमआयसी) बिडकीन पट्ट्यात अद्याप एकही अँकर प्रोजेक्ट आलेला नाही. याठिकाणी मोठ्या उद्योगांची गुंतवणूक सुरू झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘ऑरिक’चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी सांगितले. 

‘डीएमआयसी’साठी अंतर्गत शेंद्रा आणि बिडकीन पट्ट्यात आतापर्यंत १० हजार एकर भूसंपादन केले आहे. यामध्ये बिडकीन पट्ट्यात ८ हजार एकर, तर शेंद्रा पट्ट्यात २ हजार एकर जमीन संपादित करण्यात आली असून या क्षेत्रावर पायाभूत सुविधांची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये शेंद्रा येथे पहिल्या टप्प्यामध्ये रस्ते, उड्डाणपूल, सौंदर्य बेटे, भूमिगत केबल ही कामे पूर्ण झाली आहेत. बिडकीन पट्ट्यात ‘एल एण्ड टी’ या कंपनीकडून पायाभूत सुविधा पुरवण्याची कामे करण्यात आली आहेत. 

तथापि, आता बिडकीन पट्ट्यात दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाची चर्चा सुरू झाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्येही याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, भूसंपादनाच्या या चर्चेला एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी विराम दिला आहे. ‘डीएमआयसी’चा बिडकीन पट्टा ‘लाँच’ होत नाही, तोपर्यंत याठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाला सुरुवात केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

बिडकीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये पाणी, दळणवळणासाठी रस्त्याची सुविधा नसल्यामुळे उद्योग तेथे गुंतवणुकीसाठी धजत नाहीत का, असे विचारले असता ‘एमआयडीसी’चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव म्हणाले की, एखाद्या बहुराष्ट्रीय किंवा मोठ्या उद्योगाने याठिकाणी गुंतवणुकीची तयारी दर्शविली, तर त्यांना लगेच खोडेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाईल. सध्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद आहे. देशांतर्गत विमानसेवा देखील पूर्णपणे सुरू नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तसेच देशातील मोठ्या उद्योगांच्या अधिकाऱ्यांना हा परिसर पाहण्यासाठी येता येत नाही. 

स्टील कंपनीचा विचार
रशियन स्टील उद्योगाच्या माध्यमातून बिडकीन इंडस्ट्रीयल पट्टा लाँच करण्याचा विचार होता. ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियन स्टील उद्योगाला बिडकीन इंडस्ट्रीयल पट्ट्यात जमीन देण्यासाठी प्रयत्न केले होते; परंतु या उद्योगाला स्टीलच्या एक्स्पोर्टसाठी रेल्वे ट्रॅक जवळ पाहिजे होता. त्यामुळे या उद्योगाने ऑरिक जवळ प्लांट उभारण्यासाठी पसंती दर्शविली. 

Web Title: Waiting for the anchor project; DMIC's second phase of land acquisition stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.