तीन महिने उलटले तरीही औरंगाबाद-उदयपूर विमानसेवेची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 06:58 PM2019-04-01T18:58:06+5:302019-04-01T18:58:41+5:30
उडान योजनेंतर्गत जेट एअरवेजला झाला होता मार्ग जाहीर
औरंगाबाद : नागरी उड्डयन मंत्रालयाने ‘उड़े देश के आम नागरिक’च्या (उडान) तिसऱ्या फेरीत जानेवारीत महाराष्ट्रात विविध मार्गांना मान्यता दिली आहे. यामध्ये जेट एअरवेजलाऔरंगाबाद-उदयपूरमार्ग जाहीर करण्यात आला; परंतु जेट एअरवेज कंपनीतील अंतर्गत संकटामुळे या विमानसेवेची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
औरंगाबादमधून पूर्वी जयपूर- उदयपूरसाठी हवाई कनेक्टिव्हिटी होती. त्यामुळे शहरात जयपूर- उदयपूरहून येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या होती. औरंगाबादला आल्यानंतर जगप्रसिद्ध अजिंठा- वेरूळ लेणीला पर्यटक भेट देत. त्यातून पर्यटन व्यवसायदेखील वाढत असे; परंतु ही विमानसेवा बंद झाली आणि पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला. औरंगाबादहून- उदयपूर- जयपूर ही विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी शहरातील उद्योजक आणि पर्यटन व्यावसायिकांकडून गेली काही वर्षे करण्यात येत होती. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांच्याकडून औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जानेवारीत ‘उडान’मध्ये औरंगाबाद-उदयपूर विमान मार्गाचा समावेश करण्यात आला. हा मार्ग आता जेट एअरवेजला देण्यात आला. त्यामुळे त्यांच्याकडून लवकरच या मार्गावर विमानसेवा सुरूहोईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; परंतु जेट एअरवेजच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हे विमान नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नाही. यासंदर्भात विमानतळाच्या संचालकांनी टष्ट्वीटदेखील केले आहे.
स्पाईस जेटकडून विचार
स्पाईस जेटकडून औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. विशेषत: ‘उडान’अंतर्गत बुद्धिस्ट सर्किटसाठी हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची आशा चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाकडून व्यक्त होत आहे.