'अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षाच'; प्रशासन आणि जिल्हा बँकेच्या विसंगत भूमिकेचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 07:45 PM2021-11-12T19:45:05+5:302021-11-12T19:45:45+5:30

जिल्हा बँकेच्या संचालकांनी आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम न देता खात्यावर थेट आरटीजीएस करा ही भुमीका घेऊन धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

'Waiting for compensation for flood victims'; The inconsistent role of the administration and the district bank hit the farmers | 'अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षाच'; प्रशासन आणि जिल्हा बँकेच्या विसंगत भूमिकेचा शेतकऱ्यांना फटका

'अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षाच'; प्रशासन आणि जिल्हा बँकेच्या विसंगत भूमिकेचा शेतकऱ्यांना फटका

googlenewsNext

- श्रीकांत पोफळे
करमाड (औरंगाबाद ) : खरिप हंगामाची सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्ठीची नुकसान भरपाई खात्यावर जमा होण्याची शेतकरी दिवाळीच्या पूर्वीपासून प्रतीक्षेत आहे. जिल्हा बँक व जिल्हा प्रशासन यांच्या आपसातील विसंगत भूमिकेमुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळायला उशीर होत असल्याचे चित्र आहे. यामुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद तहसील मार्फत जिल्हा बँकेला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी व धनादेश देखील देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेच्या संचालकांनी आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम न देता खात्यावर थेट आरटीजीएस करा ही भुमीका घेऊन धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे धनादेश पुन्हा तहसील कार्यालयात पाठवण्यात आले. कारण सोयगाव व फुलंब्री तालुक्याला पैसे आरटीजीएस द्वारे दिल्या गेले. तहसीलदार ज्योती पवार यांनी जिल्हाधिकारी यांना धनादेश परत मिळाल्यासंदर्भात कल्पना दिली. त्याची जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेत. बैठकीमध्ये जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक आर.आर. शिंदे यांना हे धनादेश स्वीकारून मदत तात्काळ पोहोचविण्यास संदर्भात पावले उचलण्याचे आदेश दिले. 
त्यानंतर तहसीलमार्फत पुन्हा हे धनादेश व त्यासोबत शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेला पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. या सर्व प्रक्रियेमुळे व जिल्हा बँक व जिल्हा प्रशासन यांच्या विसंगत भूमिकेमुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी तर सोडा दिवाळीनंतर जवळपास आठवडा उलटत आला तरी देखील मिळालेली नसल्याने बळीराजा हवालदिलं झाला आहे.

लवकर मदत देण्यासाठी 'आरटीजीएस'चा आग्रह
तहसीलमार्फत आम्हाला एसबीआयचा धनादेश दिला हा धनादेश वटण्यासाठी किमान चार दिवस लागणार होते. शेतकऱ्यांना मोबदला दिवाळीपूर्वी देण्याची आम्ही संपूर्ण तयारी केली होती. जर जिल्हा बँकेने आरटीजीएसद्वारे पैसे दिले असते तर आम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे जमा करता आले असते. याच भूमिकेतून आम्ही धनादेश परत करून आरटीजीएसचा असा आग्रह केला. सोयगाव व फुलंब्री तालुक्याला यांनी आरटीजीएस द्वारे पैसे पाठवलेले आहेत.
- जावेद पटेल , संचालक, जिल्हा बँक

धनादेश आणि याद्या दिल्या 
नुकसान भरपाईचा मोबदला देण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची यादी व धनादेश यापूर्वीही देत आलो. त्याच पद्धतीने आम्ही जिल्हा बँकेत धनादेश व याद्या पाठवल्या होत्या. मात्र जिल्हा बँकेने या याद्या व धनादेश परत केल्या. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर पुन्हा या याद्या व धनादेश जिल्हा बँकेने स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
- जोती पवार,​ तहसीलदार, औरंगाबाद

Web Title: 'Waiting for compensation for flood victims'; The inconsistent role of the administration and the district bank hit the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.