स्त्रीरोग विभागात डॉक्टरांची ‘वेटींग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:20 AM2017-10-13T00:20:39+5:302017-10-13T00:20:39+5:30

जिल्हा रुग्णालयातील बाह्य स्त्रीरोग विभागात मागील काही दिवसांपासून डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू आहे

'Waiting' for doctors in gynecology department | स्त्रीरोग विभागात डॉक्टरांची ‘वेटींग’

स्त्रीरोग विभागात डॉक्टरांची ‘वेटींग’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालयातील बाह्य स्त्रीरोग विभागात मागील काही दिवसांपासून डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू आहे. वेळेवर रुग्णालयात येत नसल्यामुळे महिला रुग्णांवर डॉक्टरांच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हाभर फिरून ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा रुग्णालयातही त्यांनी रुग्णालयांचे हाल होणार नाहीत, त्यांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या; त्यांच्या या प्रयत्नांना जिल्हा रुग्णालयात डॉक्टर हरताळ फासत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शल्य चिकित्सकांच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. रुग्णांना तासन्तास डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
बाह्य रुग्ण विभागात रुग्ण तपासणी करायची असल्याची चिठ्ठी काढण्याची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० अशी आहे. डॉक्टरांनी ९ वाजता येऊन शेवटच्या रुग्णापर्यंत तपासणी करणे अनिवार्य आहे; परंतु काही डॉक्टर बायोमेट्रिक प्रणालीत आपण आल्याची नोंद करून इतरत्र फिरत असल्याचा आरोप रुग्णांमधून केला जात आहे.
स्त्री रोग विभागात सकाळी साडेनऊ वाजता एकही डॉक्टर हजर नव्हता. केवळ दोन सेविका नाश्ता करताना दिसून आल्या, तर बाहेर महिला रुग्णांची तपासणीसाठी लांबच लांब रांग लागल्याचे दिसून आले. आजारी असताना त्यांना अशा प्रकारे प्रतीक्षेत ठेवले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: 'Waiting' for doctors in gynecology department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.