पाच हजार कामगार अनुदानाच्या प्रतीक्षेत
By Admin | Published: December 11, 2014 12:27 AM2014-12-11T00:27:40+5:302014-12-11T00:42:38+5:30
लातूर : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू करून नोंदणीकृत कामगारांना सहाय्य अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहेत़
लातूर : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू करून नोंदणीकृत कामगारांना सहाय्य अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहेत़ चालू वर्षात ३१ आॅगस्टपर्यंत नोंदणी केलेल्या कामगारांना प्रत्येकी ३ हजाराचे अनुदान देण्याचे काम सुरू केले आहे़ काही कामगारांच्या बँक खात्यावर अनुदान जमा केले असले तरी ५ हजार कामगार अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत़
लातूर जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या कामगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू केले आहे़ या नोंदणीत १०० दिवसापेक्षा जास्त दिवस रोपवाटीका, वृक्षलागवड ही कामे सोडून बांधकाम, रस्ते, कॅनॉल, बिल्डींग, ट्रान्समिशन टॉवर आदी ठिकाणी काम केलेल्या कामगाराला नोंदणी करून काम उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले आले़ तसेच ३१ आॅगस्टअखेरपर्यंत नोंदणी केलेल्या कामगारांना प्रत्येकी तीनहजार रूपयाचे सहाय्यक अनुदान त्या त्या कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे कामही प्रगतीपथावर सुरू करण्यात आले आहे़ ३१ आॅगस्ट अखेरपर्यंत नोंदणी केलेल्या ३६०० कामगारांना अनुदान देण्यात आलेले आहे़ तर उर्वरीत पाचहजार कामगारांनाही टप्याटप्याने सहाय्यक अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी हे कामगार अध्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़ (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यात कामगारांच्या नोंदणीचे काम दिवसेंदिवस वाढत असले तरी जिल्ह्यातील देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ या तालुक्यात कामगारांच्या नोंदणीचे काम अत्यल्प आहे़ नोंदणीसाठी मतदानकार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, तीन छायाचित्र व ९० दिवसांच्या कामाचा अनुभव अशी कागदपत्रे लागत असल्याने नोंदी कमी आहेत.
५० टक्के कामगारांसाठी व्यक्तिमत्व विकास़़़
कामगारांना व्यक्तीमत्व विकास योजनेअंतर्गत एकूण नोंदणी केलेल्या कामगारांच्या पन्नास टक्के कामगारांना व्यक्तिमत्व विकासाच्या पुस्तकाचे वाटप करण्यात येत आहे़ यामध्ये कामगारांच्या पाल्यांना गोष्टी, जनरल नॉलेज व इतर ज्ञानात भर टाकणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे परंतू उर्वरीत कामगारांना ही पुस्तके कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे़