घरफोडींच्या घटना वाढल्याने बँकेत लॉकर्ससाठी वेटिंग; मौल्यवान वस्तू, कागदपत्रांच्या सुरक्षेस प्राधान्य
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 6, 2023 08:05 PM2023-05-06T20:05:55+5:302023-05-06T20:06:28+5:30
आता अशी परिस्थिती आहे, की बँकेत लॉकर्स लगेच उपलब्ध होणे कठीण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे सोने-चांदीचे भाव उच्चांकी जात आहेत, दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीने घरातील दागिने बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवले जात आहेत; पण तिथेही सर्व लॉकर्स फुल असल्याने ग्राहकांना आपले दागिने ठेवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
कितीही सोने-चांदी महाग झाले तरी खरेदीचा मोह सुटत नाही. काही जण गुंतवणूक म्हणूनही याकडे पाहतात. मात्र, वाढत्या घरफोड्या, मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे आता नागरिक दागिने बँकेत ठेवणे पसंत करीत आहेत. त्यासाठी बँक भाडे आकारते ते सुद्धा ग्राहक भरत आहेत. मात्र, आता अशी परिस्थिती आहे, की बँकेत लॉकर्स लगेच उपलब्ध होणे कठीण झाले आहे.
सोने ६१ हजारांवर
सोन्यात गुंतवणूक करणे सर्वांना फायदेशीर वाटत आहे. यामुळे सोन्याचे भावही वाढत आहे. बुधवारी सोने ६१,९०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊन पोहोचले होते. गुरुपुष्यामृतच्या दिवशी ६१६०० रुपयांनी सोने विकले गेले होते.
चांदी ७६ हजारांवर
आज चांदीचे भावही ७६००० रुपयांवर येऊन ठेपले. ही भाववाढ डोळे पांढरे करणारी ठरत आहे. लग्नसराई सुरू झाल्याने चांदीला मागणी वाढली आहे. चांदीचे ताट, चांदीचे तांबे, ग्लास आदींची विक्री वाढली आहे.
बँकांमध्ये लॉकर्ससाठी वेटिंग
१) सेंट्रल बँक ऑफ इंडिया : मुख्य रस्त्यावरील बँकांच्या ज्या शाखा आहेत. तिथे लॉकर्स फुल झाले आहेत. प्रतीक्षा यादी लागली आहे.
२) स्टेट बँक ऑफ इंडिया : लॉकर्समध्येच दागिने, मालमत्ता कागदपत्रे ठेवणे पसंत करत असल्याने लॉकर्सची संख्या अपुरी पडत आहे. येथेही प्रतीक्षा यादी आहे.
३) देवगिरी बँक : पूर्वी या बँकेच्या मुख्य रस्त्यावरील शाखेत लॉकर्स फुल असून, अंतर्गत रस्त्यावरील शाखेतही लॉकर्स फुल आहेत. काही शाखेत प्रतीक्षा यादी आहे.
का वाढली लॉकर्सची मागणी
घरात सोने, दागिने ठेवणे जोखमीचे झाले आहे. बंद घर असेल तर घरफोडी होतेच. यामुळे नागरिक, जास्त भाडे लागले तरी चालेल; पण बँकेच्या लॉकर्समध्ये दागिने ठेवणे पसंत करीत आहे. याशिवाय मालमत्तेचे कागदपत्रेही लॉकर्समध्ये ठेवली जात आहेत.
लॉकर्सचे वर्षाचे दर किती
लहानसाठी १२०० ते १३०० रुपये
मध्यमसाठी २५०० ते २६०० रुपये
मोठा आकार- ३००० ते ३१०० रुपये
डिपॉझिटही घेतले जाते
खाजगी, सहकारी बँका २५ हजार ते १ लाख दरम्यान डिपॉझिट घेतले जाते.
वर्षातून एकदा ऑपरेट करणे आवश्यक
आरबीआयच्या नवीन नियमाप्रमाणे आपले लॉकर्स वर्षातून एकदा ऑपरेट करणे आवश्यक आहे, तसेच पूर्वी रजिस्टरवर नोंद होत असे; पण आता सिस्टममध्ये लॉकर्सची नोंद केली जात आहे. एवढेच नव्हे, तर बँक व ग्राहकांमधील लॉकर्सचा करार केला जात असून, तो १०० रुपयांच्या बाँडपेपरवर केला जात आहे.