पाऊणकोटीचा धान्य चाळणी प्रकल्पाला प्रतीक्षा उद्घाटनाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:04 AM2021-07-28T04:04:47+5:302021-07-28T04:04:47+5:30
जयेश निरपळ गंगापूर : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाऊणकोटी रुपये खर्च करून उभारण्यात ...
जयेश निरपळ
गंगापूर : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाऊणकोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला धूळ-धान्य चाळणी प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळखात पडला आहे. वीज जोडणी रखडल्याने यंत्र कार्यान्वित होण्यास विलंब होत असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात येत आहे.
बाजार समितीच्या वतीने मार्च-२०१९ मध्ये राज्य पणन मंडळाकडे धान्य चाळणी प्रकल्पाची मागणी केली गेली. ऑक्टोबर २०१९ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यातील ३१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात धान्य चाळणी प्रकल्पास मान्यता देण्यात आली. त्यात गंगापूर बाजार समितीचाही समावेश होता. ७२ लाख ९२ हजार रुपये किमतीच्या या प्रकल्पात १४ लाख २४ हजार रुपयाची कृषी पणन मंडळाची गुंतवणूक आहे. ४२ लाख ३८ हजार रुपये मंडळाने बाजार समितीस दहा वर्षांसाठी वार्षिक तीन टक्के दराने कर्ज दिले आहे, तर १६ लाख ३० हजारांचे शासकीय अनुदान मिळाले. प्रतितास दोन मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प अनेक महिन्यांपासून बाजार समितीच्या आवारात उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
---
शेतीमालाची होईल प्रतवारी
विद्युत जोडणी रखडल्याने प्रकल्प कार्यान्वित होण्यास विलंब होत आहे. समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सदरील प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना धान्याची साफसफाई करता येणार आहे, तसेच शेतीमालाची प्रतवारी करता येणार असून, यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तो भाव मिळण्यास मदत होणार आहे.
कोट
प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, विद्युत जोडणीचे प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. ती पूर्ण होताच प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. बीओटी तत्त्वावर प्रकल्प चालविण्यास देण्याचा समितीचा मानस आहे.
-मनीष गजभिये, सचिव, कृउबास, गंगापूर
270721\screenshot_20210727-181103_gallery.jpg
गंगापूर - उद्घाटनासाठी विद्युत जोडणीच्या प्रतिक्षेत असलेला बाजार समितीच्या आवारातील धान्य चाळणी प्रकल्प