दोन वर्षांपासून व्याज अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:04 AM2021-05-06T04:04:47+5:302021-05-06T04:04:47+5:30
घाटनांद्रा : सहकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जावरील व्याजाचे अनुदान गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यात तिसऱ्या ...
घाटनांद्रा : सहकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जावरील व्याजाचे अनुदान गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यात तिसऱ्या वर्षांची व्याजासह वसुली सोसायटी व बँकांनी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे.
५० हजारांखाली असलेल्या शेतकऱ्यांना विनाव्याज पीक कर्ज बँका व सहकारी सोसायटीच्या वतीने देण्यात येते. मात्र, कर्ज घेतेवेळी बँकाकडून सहा टक्के व्याजाची आकारणी केली जाते. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी व्याज अनुदान योजनेतून तीन टक्के व केंद्र शासनाच्या वतीने तीन टक्के याप्रमाणे सहा टक्के व्याजाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाचा लाभ होतो. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून या योजनेतील अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. शेतकऱ्यांनी पुन्हा तिसऱ्या वर्षाची व्याजासह वसुली बँका व सहकारी सोसायट्यांनी सुरू केली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात शासनाच्या प्रत्येक योजनेच्या माध्यमातून भोपळाच दिला जात असल्याची तक्रार येथील नियमित कर्ज भरणारे शेतकरी कचरू मोरे, रामकृष्ण मोरे, अशोक गुळवे, रघुनाथ मोरे यांनी केली आहे.