मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:05 AM2021-02-23T04:05:57+5:302021-02-23T04:05:57+5:30

विकास राऊत लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागात गेल्या पावसाळ्यात ...

Waiting for irrigation in Marathwada is a problem | मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची

मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची

googlenewsNext

विकास राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागात गेल्या पावसाळ्यात वरूणराजाच्या कृपेने सर्व मोठ्या, लहान, मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी असले तरी उन्हाळी पाणी आवर्तनासाठी ते पाणी सोडल्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना दरवाजे नसणे आणि प्रकल्पांना लागलेल्या गळतीमुळे हे पाणी शेतीला मिळण्याऐवजी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जायकवाडी, नांदूर मधमेश्वर कालवा, निम्न दुधना प्रकल्पांमधून उन्हाळी पिकांसाठी आवर्तने (पाणी सोडणे) १ मार्चपासून देण्यात येणार आहेत. यावर्षी मराठवाड्यातील ११ मोठ्या, ७५ मध्यम, ७४९ लघु आणि मांजरा आणि तेरणावरील ३७ अशा ८७२ प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पांद्वारे १२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक धरणांना गळती लागलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सुखना, ढेकू, खेळणा, केसापुरी,लहूकी, अंजना, पळशी यासारख्या अनेक प्रकल्पांना लहान-मोठी गळती लागलेली आहे. विभागात ३ हजार ४८ कोल्हापुरी बंधाऱ्यांना ३७ हजार ६०१ दरवाजे नाहीत. कालव्यातील गाळ, झाडेझुडपे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून काढलेली नाहीत. त्यामुळे आवर्तनातून सोडण्यात आलेले पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. त्यातच जलसंपदा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळही नाही. केवळ २८ कर्मचाऱ्यांवर सिंचनाचा खेळ सुरू आहे. गेल्यावर्षी पाणी असतानाही ३० टक्के पाणी शेतीला मिळाले. यामागे एकमेव कारण म्हणजे मोडकळीस आलेली यंत्रणा आहे.

वितरण व्यवस्थाच मोडकळीला

रब्बीचे आवर्तन सध्या सुरू आहे. कालव्यांची वितरण व्यवस्था मोडकळीस आलेली असल्याने तेच पाणी पूर्णत: शेतीला मिळाले नाही. ६७ प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी १७ कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र, हे काम मार्गी लागलेले नाही. देखभाल, दुरूस्तीअभावी सर्व काही ठप्प आहे. वितरण, कालवे यांची देखभाल, दुरूस्ती झाली तर शेतीपर्यंत पाणी जाईल अन्यथा जाणार नाही. वितरण व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. मनुष्यबळ नाही, अनेक प्रकल्पांना गळती लागलेली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे सुरू असल्याचे मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंत्यांची माहिती अशी

कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले, जलसंपदा विभागावर आवर्तन देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी आहे. त्या विभागाला देखभाल आणि दुरूस्तीबाबत अवगत केले आहे. मागील काही दिवसात बरीच कामे झाली आहेत, त्यामुळे उन्हाळी आवर्तनातील पाण्यातून मुबलक सिंचन होईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Waiting for irrigation in Marathwada is a problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.