नव्या आरोग्य केंद्र निर्मितीस ‘बजेट’ ची प्रतीक्षा
By Admin | Published: June 11, 2014 12:14 AM2014-06-11T00:14:19+5:302014-06-11T00:24:54+5:30
हिंगोली : जिल्ह्यात गतवर्षी २००१ च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यांतर्गत ३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ९ आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यास मंजुरी
हिंगोली : जिल्ह्यात गतवर्षी २००१ च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यांतर्गत ३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ९ आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्यानंतरही या आरोग्य केंद्रांकरिता अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात आली नसल्याने गेल्या वर्षभरापासून नवीन आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे.
राज्य शासनाने २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य केंद्र स्थापनेचा बृहत आराखडा मंजूर केला होता. त्या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात भानखेडा व ब्रम्हवाडी आणि औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले होते. तसेच सेनगाव तालुक्यातील जामदया, लिंबाळा तांडा, हिंगोली तालुक्यातील हिंगणी, संतुक पिंपरी, चोरजवळा, दुर्ग सावंगी, बोरी शिकारी, वसमत तालुक्यातील सातेफळ, पळशी या ९ ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. याबाबतचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ जानेवारी २०१३ रोजी काढला होता. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने नवीन ठिकाणी मंजूर झालेल्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. सिद्धेश्वर वगळता अन्य सर्व ठिकाणी आरोग्य केंद्रांसाठी जागाही उपलब्ध झाल्या.
याबाबतची माहिती राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेने सादर केली; परंतु नवीन आरोग्य केंद्र उभारण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूदच अर्थसंकल्पात करण्यात आली नसल्याने गेल्या वर्षभरापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. निधीची तरतूद नसल्याने पदनिर्मित्तीही झालेली नाही. त्यामुळे केवळ दिखाऊपणासाठी नवीन आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, एकीकडे गतवर्षी मंजूर केलेल्या नवीन आरोग्य केंद्रांकरीता निधीची तरतूद उपलब्ध नसताना राज्य शासनाने ९ जून रोजी काढलेल्या आदेशात पुन्हा राज्यात ३० नवीन आरोग्य उपकेंद्र व १९ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, ४ नवीन ग्रामीण रूग्णालये मंजूर केली आहेत. तसेच २ ग्रामीण रूग्णालयातील ३० खाटांची संख्या वाढून ५० करण्यात आली आहे. तर २ ग्रामीण रूग्णालयाच्या खाटांची संख्या १०० करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील एकाही आरोग्य केंद्राचा समावेश नाही.
त्यामुळे यापूर्वी मंजुरी दिलेल्या नवीन आरोग्य केंद्रांना निधी कधी मिळणार आणि आता नव्याने मंजूरी दिलेल्या आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयांना निधी कधी मिळणार, याकडेच जनतेचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
शासनाचा निर्णय प्रलंबित
राज्य शासनाने १७ जानेवारी २०१३ रोजी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सिद्धेश्वर, भानखेडा, ब्रम्हवाडी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात आली होती मंजूरी.
जामदया, लिंबाळा तांडा, हिंगणी, संतुक पिंपरी, चोरजवळा, दुर्ग सावंगी, बोरी शिकारी, सातेफळ, पळशी या ९ ठिकाणी नवीन आरोग्य उपकेंद्र उभारण्यास देण्यात आली होती मंजुरी.
सिद्धेश्वर वगळता अन्य सर्व ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रासाठी जागा मिळाल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने शासनाला केला होता सादर.
सिद्धेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा मिळत नसल्याने प्रशासनाची गोची.
गतवर्षीच्याच नव्या आरोग्य केंद्रासाठी निधीची तरतूद नसताना पुन्हा राज्य शासनाने काही आरोग्य केंद्रांना दिली मंजुरी.