कोट्यवधींच्या उत्पन्नानंतरही प्रवाशांना सुविधांची ‘वेटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:10 AM2019-04-18T00:10:11+5:302019-04-18T00:11:02+5:30
कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत असल्याची ओरड होत आहे.
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने गेल्या वर्षभरात तब्बल ४८६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. गतवर्षीपेक्षा ६.६० टक्क्यांनी यंदा उत्पन्न वाढले आहे. मात्र, कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत असल्याची ओरड होत आहे.
भारतात पहिल्यांदा १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणेदरम्यान रेल्वे धावली. हा क्षण लक्षात घेऊन भारतीय रेल्वे दरवर्षी रेल्वे सप्ताह साजरा करते. नांदेड विभागात मंगळवारी हा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी यानिमित्ताने नांदेड विभागाच्या वर्षभरातील कामगिरीची माहिती दिली. वर्षभरात केवळ प्रवासी वाहतुकीतून ३६८.५० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा हे ७.७७ टक्क्यांनी अधिक आहे. नांदेड विभागात तिकीट तपासणीतून ६.७१ कोटींचा महसूल मिळाला आहे. तब्बल ४२६ लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. तर १.६३ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
नॉन इंटर लॉक वर्किंग करून मुदखेड ते मुगट आणि मालटेकडी-नांदेड-लिंबगावदरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता परभणी-मनमाड दुहेरीकरणाला किमान २०२२ उजाडणार आहे.
रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले, कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुकुंदवाडी, लासूर स्टेशनला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, उत्पन्न घेतल्यानंतर त्या बदल्यात प्रवाशांना सुविधा दिल्या पाहिजे. मुकुं दवाडी येथे प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे नाहीत, पिण्याचे पाणीही मिळत नाही. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे कामही रेंगाळले आहे.
मुंबईसाठी रेल्वे मिळेना
शहरातून मुंबईला जनशताब्दी, देवगिरी, नंदीग्राम आणि तपोवन एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. या रेल्वेमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नव्या रेल्वेची मागणी होत आहे. परंतु मुंबईतील रेल्वेगाड्यांच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेकडून परवानगी मिळत नाही, असेच सांगितले जाते.
पीटलाईन अडगळीत
पीटलाईन नसल्याच्या कारणानेही औरंगाबादहून नव्या रेल्वे सुरू होण्यास अडचण असल्याचे सांगितले जाते. प्रवासी संघटनांकडून मागणी करूनही पीटलाईनचा प्रस्ताव अडगळीत पडला आहे. जुन्या रेल्वेस्टेशनच्या इमारतीच्या विकासाचीही नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.