सहा महिन्यांपासून २६ हजारांवर कर्णबधिर दिव्यांगांना ‘यूडीआयडी’ची प्रतीक्षा; घाटीत ऑपरेटर अभावी माहिती ‘अपडेट’ होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 05:02 PM2018-08-22T17:02:39+5:302018-08-22T17:04:03+5:30
गत सहा महिन्यांत जवळपास फक्त केवळ चार टक्के कर्णबधिर दिव्यांगांनाच यूडीआयडी क्रमांक मिळाला असून, उर्वरित जवळपास २६ हजारांवर दिव्यांग प्रतीक्षेत असल्याची माहिती हाती आली आहे.
औरंगाबाद : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र आणि केंंद्र शासनाचा युनिक डिसअॅबिलिटी आयडेंटिटी क्रमांक (यूडीआयडी)आवश्यक असतो. गत सहा महिन्यांत जवळपास फक्त केवळ चार टक्के कर्णबधिर दिव्यांगांनाच यूडीआयडी क्रमांक मिळाला असून, उर्वरित जवळपास २६ हजारांवर दिव्यांग प्रतीक्षेत असल्याची माहिती हाती आली आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. शासकीय सेवेतही या वर्गासाठी राखीव जागा आहेत. एवढेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेत एकूण निधीच्या ३ टक्के निधी हा दिव्यांगांच्या विकासासाठी राखीव ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, याचा लाभ मिळण्यापासून औरंगाबादसह मराठवाड्यातील दिव्यांग बांधवांना वंचित राहावे लागत आहे. घाटी रुग्णालयातील नाक, कान आणि घसा विभागात दिव्यांग असल्याची रीतसर नोंदणी केली जाते.
या विभागात कर्णबधिर दिव्यांगांच्या प्रमाणपत्रासाठी जवळपास २६ हजारांवर नोंदणी झालेली आहे, तर केवळ १०० उमेदवारांना आतापर्यंत युनिक डिसअॅबिलिटी आयडेंटिटी क्रमांक मिळू शकलेला आहे. गत अनेक महिन्यांपासून आॅनलाईन पद्धतीची माहिती अपडेट करण्यात आलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. केवळ आॅपरेटर नसल्याने केंद्र शासनाच्या वेबसाईटवर माहिती आॅनलाईन पद्धतीने अपडेट करण्याचे काम रखडले आहे. केवळ नोंदणी प्रमाणपत्र देऊन दिव्यांगांना योजनांचा फायदा मिळणार नाही.
या दिव्यांगांना यूडीआयडी अर्थात युनिक डिसअॅबिलिटी आयडेंटिटी क्रमांक महत्त्वाचा असतो. त्यानंतर केंद्राच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याचा हक्क या दिव्यांगांना राहतो. आॅनलाईन पद्धतीने ही माहिती अपडेट होत नसल्याने या उमेदवारांना दिव्यांगांसाठीचे यूडीआयडी क्रमांक मिळत नसल्याच्या दिव्यांग बांधवांच्या आहेत. संबंधित अधिकारी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यूडीआयडी क्रमांक मिळवून देण्याची मागणी या उमेदवारांतून केली जात आहे. यासंदर्भात घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.
आॅपरेटर नेमण्यास मुहूर्त मिळेना
केवळ आॅपरेटरअभावी आॅनलाईन पद्धतीने माहिती भरता येत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच हजारो कर्णबधिर उमेदवारांना युनिक डिसअॅबिलिटी आयडेंटिटी क्रमांक मिळू शकलेला नाही. घाटी रुग्णालय प्रशासनाला आॅपरेटर नेमण्यास अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.