भिंतीला भेगा पडल्या, छत गळू लागले; शाळा भरवायची कशी? विद्यार्थी शिकणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 08:22 PM2024-08-16T20:22:13+5:302024-08-16T20:22:54+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या मुळावर
- दादासाहेब गलांडे
पैठण : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या १२ केंद्रांमधील १२४ वर्गखोल्यांमधील काही खोल्यांच्या भिंतीला तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी छत टपकत आहे. कोंदट वातावरणामुळे जीव कासावीस होत असताना या धोकादायक खोल्यांमध्ये ज्ञानार्जन करण्याची वेळ चिमुकल्यांवर आली आहे.
पैठण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६४ शाळा असून, या शाळांमधील ३० वर्गखोल्यांमध्ये २९ हजार ९०५ विद्यार्थी शिक्षण घेतात. २०२२-२३ मध्ये तालुक्यातील निजामकालीन १३ वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. उर्वरितपैकी १२४ वर्गखोल्यांची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. यातील १८ वर्गखोल्यांची भिंत तर कधीही कोसळू शकते. त्यामुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या वर्गखोल्यांमध्ये बसत आहेत. या वर्गखोल्यांच्या पत्र्याच्या छताला गळती झाली असून, अनेक ठिकाणी वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत. फरशा उखडल्या आहेत. या शाळांच्या परिसरातील स्वच्छतागृहांची स्थितीही दयनीय झाली आहे. काही ठिकाणच्या वर्गखोल्यांच्या खिडक्या, दरवाजे खिळखिळे झाले असून, ते कुजले आहेत. पावसाळ्यात या वर्गखोल्या गळत असल्याने सतत कोमट वास येतो. अशाच स्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात भरतात वर्ग
पैठण तालुक्यातील पिंपळवाडी केंद्रांतर्गत पाचलगाव येथील वर्गखोल्या धोकादायक झाल्यामुळे या शाळेत वर्ग भरवणे गेल्या १५ दिवसांपासून बंद करण्यात आले आहे. आता येथील पहिली ते चौथीचे वर्ग ग्रामपंचायत कार्यालयात भरत आहेत. तशी माहिती केंद्रप्रमुख मंगल मदने यांनी दिली. असे असताना येथील शाळेच्या दुरुस्तीसाठी अद्याप शिक्षण विभागाने पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभाग शाळांबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते, अशी खोचक टीका येथील ग्रामस्थ करीत आहेत.
वर्गखोल्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे
तालुक्यातील २६४ पैकी १८ वर्गखोल्या वर्ग भरविण्यालायक नसल्याने त्या पाडण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला असून, १२४ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव २३ जुलै २०२४ रोजी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड व जि. प.चे कनिष्ठ अभियंता आनंद मैराळ यांनी दिली. नवीन १५२ वर्गखोल्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
या केंद्रातील वर्गखोल्यांची होणार दुरुस्ती
आडुळ १८, आपेगाव १०, कडेठाण ५, ढोरकीन ५, निलजगाव १०, पाचोड १३, पिंपळवाडी (पि) १२, पैठण ५, बालानगर २२, लोहगाव १५, विहामांडवा २, पानराजनगाव १.