बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवलेला वाल्मीतील प्राध्यापक बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 06:05 PM2019-07-03T18:05:21+5:302019-07-03T18:07:52+5:30
२०१४ मध्ये मिळवली नोकरी
औरंगाबाद : जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी) बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविणारा प्रा. डॉ. वृषसेन पुरुषोत्तम पवार (रा. थेरगाव, जि. पुणे) याच्यावर जलसंधारण आयुक्त दीपक सिंघला यांनी सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सोमवारी केली.
दीड वर्षापासून हे प्रकरण वाल्मीसह जलसंधारण विभागात चर्चेला होते. सहा महिन्यांपूर्वीच डॉ. पवार याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. चौकशीअंती त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून, हायकोर्टामध्ये वाल्मीने कॅव्हेटही दाखल केले आहे.
जुलै २०१८ मध्ये डॉ. पवार याच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने वाल्मीत नोकरी मिळविल्याची ती तक्रार होती. २३ फेबु्रवारी २०१४ साली डॉ. पवार याने वाल्मीत सेवेत येण्यासाठी मुलाखत दिली होती.
जलसंधारण आयुक्त सिंघला यांनी सांगितले, डॉ. पवार याला सेवेतून बडतर्फ केले आहे. दीड वर्षापासून ते प्रकरण सुरू होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने वाल्मीत नोकरी मिळविली होती. विज्ञान विभागात तो प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. त्याने विनापरवाना दुसऱ्या, संस्थेत नोकरी मिळविली. चौकशीदरम्यान संपर्कात नव्हते. मध्यंतरी त्याने हायकोर्टात वाल्मीविरोधात याचिका दाखल केली होती. डॉ. पवार याने सादर केलेले मध्यप्रदेशमधील बरेच अनुभव प्रमाणपत्र बनावट होते. वाल्मीने याप्रकरणी त्याला नोटीस बजावली होती; परंतु त्याने त्याचे काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळे सर्व चौकशीअंती त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.