वाळूज परिसर तूर्त मनपा हद्दीत येणार नाही, पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:48+5:302021-03-04T04:06:48+5:30
औरंगाबाद : वाळूज, तिसगाव, सिडको महानगर आधी परिसर महापालिका हद्दीत घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार नगररचना विभागाने प्रस्ताव ...
औरंगाबाद : वाळूज, तिसगाव, सिडको महानगर आधी परिसर महापालिका हद्दीत घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार नगररचना विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे काम केले; मात्र तूर्त हा संपूर्ण परिसर महापालिका हद्दीत घेण्याचा कोणताही विचार नाही. शहरात सध्या पोलीस आयुक्तालयाची जेवढी हद्द आहे तेवढी हद्द भविष्यात महापालिकेची असायला हरकत नाही, असे मत महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
लोकसंख्येचा विचार करता बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ संघटनेने वाळूज परिसराचा मनपा हद्दीत समावेश करावा, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले. शासनाकडे हा प्रस्ताव जाण्यापूर्वीच वाळूज परिसरातील राजकीय मंडळींनी कडाडून विरोध सुरू केला. दरम्यान या सर्व प्रक्रियेबद्दल पाण्डेय यांनी सांगितले की, तूर्त वाळूज परिसर महापालिका हद्दीत घेण्याचा आमचा कोणताही विचार नाही. रस्ते, पाणी, कचरा हे प्रश्न मार्गी लागले आहेत. शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. भविष्यात शहरातील विविध प्रश्न संपल्यावर वाळूज किंवा आसपासचा परिसर मनपा हद्दीत समावेश करायला हरकत नाही. पोलीस आयुक्तालयाची हद्द आहे, तिथपर्यंत महापालिकेचीही हद्द असायलाच हवी, कारण विकास कामे करण्यासाठी बरेच सोयीचे होईल.