रांजणगावात माहिश्मती देखाव्याची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 05:08 PM2019-09-10T17:08:12+5:302019-09-10T17:08:17+5:30
बाहुबली चित्रपटातील माहिश्मती साम्राज्याचा देखाव्याने गणेश भक्तांना भुरळ पाडली आहे.
वाळूज महानगर : रांजणगावातील श्री संत सावता तरुण गणेश मंडळाने उभारलेल्या बाहुबली चित्रपटातील माहिश्मती साम्राज्याचा देखाव्याने गणेश भक्तांना भुरळ पाडली आहे. या देखावा पाहण्यासाठी वाळूजमहानगरातील भाविक व नागरिकांची अलोट गर्दी होत आहे.
रांजणगावात ३१ वर्षांपासून श्री संत सावता गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवात प्रबोधनात्मक आकर्षक देखावे उभारण्यात येतात. या मंडळाचे जवळपास ४५० सदस्य असून, कुणाकडूनही वर्गणी जमा न करता मंडळाचे पदाधिकारी स्वखर्चातून देखावे तयार करतात. यंदाच्या गणेश उत्सवात मंडळाच्या पदाधिकारी ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही’ हा संदेश भक्तांना देण्यासाठी बाहुबली चित्रपटातील माहिश्मती साम्राज्याचा देखावा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले असून, समोर दोन हत्तींच्या हुबेहुब प्रतिमा उभारल्या आहे. या प्रवेशद्वारातून आत जाताच रथावर राजा भल्लाळ देवाची मूर्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेते. रथासमोर ६ अश्व असून, डाव्या बाजुला राजमाता देवसेना, कटप्पा, बाहुबली यांचे पुतळे उभारले आहेत. या ठिकाणी भव्य-दिव्य राजदरबार दाखविण्यात आला असून, राज दरबारातील सिंहासनावर श्री गणराय विराजमान झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या देखाव्यालगतच्या भिंतीवर ‘बेटी पढाव-बेटी बचाव’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आदींसह समाज प्रबोधन करणारे फलक उभारण्यात आले आहे. या देखाव्यासाठी आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हुबेहुब साकारलेल्या माहिश्मती साम्राज्याचा देखावा परिसरात आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे.
हा देखावा उभारण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब बोºहाडे, उपाध्यक्ष साईनाथ जाधव, गोविंद जाधव, प्रभाकर महालकर, मंगेश सवाई, अमोल ठाकुर, सदस्य संदीप सवाई, किशोर थोरात, जयराम सवाई, सोमीनाथ हिवाळे, विष्णु जाधव, दत्तल हिवाळे, गोरखनाथ हिवाळे, बाबूराव हिवाळे, अशोक गोरे, सुभाष गोरे, कृष्णा जोशी, रवी थोरात,योगेश बनकर, शिवाजी जाधव, गोकुळ हिवाळे, करण जाधव आदी परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे हा देखावा उभारण्यासाठी कला शिक्षक अशोक गोरे,दीपक जाधव, सुभाष गोरे यांनी बुध्दीमत्ता व कौशल्याचा वापर करुन हा देखावा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.