रांजणगावच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 09:15 PM2024-01-11T21:15:59+5:302024-01-11T21:16:16+5:30
अग्नीशमन कर्मचाऱ्यांनी रात्री चौघांना बाहेर काढले.
मेहमूद शेख
वाळूज महानगर: तलावात पोहण्यासाठी गेलेल्या रांजणगावच्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची ह्दयद्रावक घटना आज गुरुवारी सांयकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. मयतात दोन सख्खे भाऊ असून ते दोघा मित्रासोबत तलावात पोहण्यासाठी गेले होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास या चौघांना अग्नीशमनदलाच्या कर्मचा-यांनी बाहेर काढले.
रांजणगावातील जावेद शेख यांची अफरोज शेख (१४), अबरार शेख (१२) ही दोन मुले आपले मित्र बिश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय व अन्य एकासोबत गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते. सांयकाळी ५ वाजले तरी मुले घरी न आल्याने जावेद शेख हे आपल्या इतर नातेवाईकांना सोबत घेऊन आपल्या मुलांचा परिसरात सर्वत्र शोध घेत होते. ही शोध मोहिम सुरु असतांना रांजणगावच्या बनकरवाडीलगत असलेल्या पाझर तलावाजवळ जावेद शेख व त्यांचे नातेवाईक मुलांना शोधत होते. तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आल्याने जावेद शेख यांना मुले तलावात बुडाल्याचा संशय आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी जावेद शेख यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्नीशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावात दिली.
अग्नीशमन कर्मचा-यांनी रात्री चौघांना बाहेर काढले
रांजणगावच्या तलावात चार शाळकरी मुले बुडाल्याची माहिती वा-यासारखी वाळूज उद्योगनगरीत पसरल्याने शेकडो जणांनी तलावाच्या ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी वाळूज अग्नीशमन दलाचे पी.के.चौधरी, के.टी.सुर्यवंशी, पी.के.हजारे, एन.एस.कुमावत, एस.बी.महाले, वाय.डी.काळे, एस.बी.शेंडगे यांनी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास नागरिकांच्या मदतीने अफरोज शेख अबरार शेख, बिश्वजीतकुमार व अन्य एक अशा चार मुलांना बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गणेश ताठे, उपनिरीक्षक पुंडलीक डाके, शिवाजी घोडपडे, पोकॉ. योगेश शळके आदींनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने या चार जणांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतुन शासकीय रुग्णालयात रवाना केले.
रांजणगावात पसरली शोककळा
गावातील पाझर तलावात चार शाळकरी मुले बुडाल्याची माहिती वा-यासारखी रांजणगावात पसरली होती. यावेळी प्रभाकर महालकर, दत्तु हिवाळे, दीपक बडे, जावेद शेख, साईनाथ जाधव, दीपक सदावर्ते आदींनी तलावातुन मुलांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.