पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती; मराठवाड्यातील २० लाख नागरिकांची तहान टँकर भागवते

By विकास राऊत | Published: June 19, 2024 06:09 PM2024-06-19T18:09:01+5:302024-06-19T18:10:10+5:30

पाणीटंचाईचे संकट कमी होत नसून १९३८ टँकरने १३६० गावे ५८३ वाड्यांना पाणीपुरवठा होत आहे.

Wandering for water even in rainy season; The tanker quenches the thirst of 2 million citizens of Marathwada | पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती; मराठवाड्यातील २० लाख नागरिकांची तहान टँकर भागवते

पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती; मराठवाड्यातील २० लाख नागरिकांची तहान टँकर भागवते

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले आहेत. मराठवाड्यात पावसाने जून महिन्यातील सरासरी गाठल्याचे आकडे सांगत असताना सुमारे २० लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर तहान भागवित आहेत.

पाणीटंचाईचे संकट कमी होत नसून १९३८ टँकरने १३६० गावे ५८३ वाड्यांना पाणीपुरवठा होत आहे. विभागातील सुमारे १० टक्के जनता पाण्यासाठी वणवण करीत आहे. निवडणुकीची रणधुमाळी संपली, निकाल लागला. केंद्रात सरकार स्थापन झाले. जय-पराजयाचे खापर एकमेकांवर फोडण्याची प्रक्रिया संपली. आता तरी शासन आणि प्रशासनाने टंचाई उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. मेच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १८ मेपर्यंत १८३७ पर्यंत टँकरचा आकडा होता. आता १९ जूनपर्यंत १९३८ टँकरचा आकडा आहे.

वाढता वाढले टँकर
जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९, जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर गेली. मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १८३७ वर टँकरचा आकडा गेला. जून महिन्यात १९३८ टँकर सुरू झाले. ४२२१ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

विभागीय आयुक्त नियुक्ती कधी होणार?
शासनाने मंगळवारी सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. परंतु, मराठवाडा विभागीय आयुक्तपद १८ दिवसांपासून रिक्त आहे. किमान टंचाईचा विचार करून तरी आयुक्तांची नियुक्ती लवकर करावी, अशी विरोधकांची मागणी आहे.

१३६० गावे, ५८३ वाड्यांवर टंचाई
सध्या १३६० गावे आणि ५८३ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. सुमारे २० लाख नागरिक दुष्काळाच्या रेट्याखाली आले आहेत. टँकरची संख्या रोज वाढत आहे. नियमित पावसाळा झाला आहे. सध्या मात्र ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४७५ गावे व ७५ वाड्या, जालना ३३४ गावे व ८१ वाड्या, परभणीत २३ गावे व ७ वाड्या, हिंगोली ५ गावे व ५ वाड्या, नांदेड ११ गावे आणि २९ वाड्या, बीड ३८३ गावे व ३५८ वाड्या, लातूर ३१ गावे आणि १६ वाड्या तर धाराशिव जिल्ह्यात ९९ गावांत टंचाई आहे.

जिल्हानिहाय टँकर संख्या
छत्रपती संभाजीनगर.......... ७४२
जालना.......... ५१३
परभणी.............३१
हिंगोली ..........१०
नांदेड.............. ३९
बीड ..............४३६
लातूर...........४४
धाराशिव........... १२३
एकूण ...........१९३८

Web Title: Wandering for water even in rainy season; The tanker quenches the thirst of 2 million citizens of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.