शासकीय वसतिगृहांत प्रवेश हवाय; मग, अर्ज केला का ?

By विजय सरवदे | Published: July 11, 2024 02:25 PM2024-07-11T14:25:58+5:302024-07-11T14:26:10+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ शासकीय वसतिगृहे आहेत

Want admission to government hostels; So, did you apply? | शासकीय वसतिगृहांत प्रवेश हवाय; मग, अर्ज केला का ?

शासकीय वसतिगृहांत प्रवेश हवाय; मग, अर्ज केला का ?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १९ वसतिगृहे चालविली जातात. या वसतिगृहांत १२ वीनंतर पुढील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तथापि, या वसतिगृहांत गुणवत्तेनुसारच प्रवेश दिले जाणार असून प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, भोजन, निर्वाहभत्ता आणि अभ्यासक्रमाचे साहित्य दिले जाणार आहे.

समाजकल्याण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या इयत्ता ८वी ते कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच १२ नंतर पदव्युत्तरपर्यंत पारंपरिक अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. छत्रपती संभाजीनगर शहरांसह जिल्ह्यात १९ शासकीय वसतिगृहे आहेत. यामध्ये मुलांचे ११ आणि मुलींसाठी ८ वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दुसरीकडे, सध्या विधानसभेच्या अधिवेशनात शासकीय वसतिगृहांत राबविण्यात येणाऱ्या ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया गाजत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पारदर्शीपणे राबविली जात नसल्याचा आरोप माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या ८वी ते कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया गेल्या महिन्यातील २९ तारखेपर्यंत आटोपली असून आता १२ वीच्या पुढे पारंपरिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात व्यवसाय अभ्यासक्रमासाठी वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी सांगितले.

३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया
शहरात किलेअर्क येथील इमारतीत प्रत्येेकी २५० क्षमतेचे वसतिगृहांचे चार युनिट असून यामध्ये एकूण १००० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय शहरात मुलांचे संत तुकाराम, मिलिंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जुने व नवीन अशी चार वसतिगृहे कार्यरत आहेत, तर मुलींसाठी शहरात २५० प्रवेश क्षमतेचे एक वसतिगृह व अन्य दोन वसतिगृहे असून ग्रामीण भागात मुलांसाठी वैजापूर, पैठण आणि कन्नड येथे तसेच मुलींसाठी कन्नड, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर व वाळूज येथील वसतिगृहांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Want admission to government hostels; So, did you apply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.