विमा कंपन्यांचे खिसे भरायचे का? शेतकऱ्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:04 AM2021-08-01T04:04:02+5:302021-08-01T04:04:02+5:30
कन्नड : तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशी आणि मका या पिकांचे मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान होऊनही शेतकरी पीकविमा ...
कन्नड : तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशी आणि मका या पिकांचे मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान होऊनही शेतकरी पीकविमा मिळण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे यंदा या दोन्ही पिकांचा विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. पीकविमा काढून विमा कंपन्यांचे खिसे भरायचे का? असा शेतकऱ्यांनी सवाल करून पीकविमा न भरलेलाच भरा, अशी भूमिका घेतलेली दिसून येत आहे.
मागील वर्षी जास्तीचा पाऊस पडला. कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी झाली. अतिपावसामुळे कपाशीच्या कैऱ्या सडल्या, तशात बोंडअळीने कहर केला. जिथे कपाशीच्या चार ते पाच वेचण्या होतात, तिथे दोन वेचण्यांत कापूस संपला. जिथे बागायती कापसाचे उत्पन्न हेक्टरी २५ क्विंटल येते. ते चार ते पाच क्विंटलवर आले. मात्र, असे असताना कपाशीचा विमा मिळाला नाही. हीच परिस्थिती मका पिकाची झाली. आधीच लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव त्यात पीक काढणीच्या वेळी पाऊस. त्यामुळे कणसांना मोड येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरीही, मका पिकाचा विमा मिळाला नाही. त्याऐवजी तूर, उडीद, मूग व तेलवर्गीय सोयाबीन या पिकांचा विमा काढण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला.
तुलनात्मक तक्ता
कंसात मागील वर्षी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या
कापूस : १३ हजार ५३४ शेतकरी (२९ हजार १०६)
मका : २४ हजार ९६९ शेतकरी (४७ हजार ८८२)
बाजरी : ८८४ शेतकरी (१ हजार ८८२ )
कांदा : ३४१ शेतकरी (३८८),
या पिकांचा विमा काढण्याकडे वाढला कल
सोयाबीन : ६ हजार ७३ शेतकरी (३ हजार ७३८),
मूग : ५ हजार ५३२ शेतकरी (३ हजार ८९६),
उडीद : १ हजार ९८० शेतकरी (९३३),
तूर : १४ हजार ६५८ शेतकरी (८ हजार ९२)
----
पीकविमा काढण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावर्षी सरासरी क्षेत्रापैकी कापूस आणि मका पिकांच्या लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. त्याऐवजी ऊस, मिरची, टोमॅटो लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात तीन पटीने वाढ झाली आहे. - बाळराजे मुळीक, तालुका कृषी अधिकारी
---
अतिवृष्टीमुळे आणि पूरपरिस्थितीमुळे पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे प्रशासनाने पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवले. परंतु, दुसरीकडे पीकविमा नाकारण्यात आला. यावरून विमा कंपन्यांची मानसिकता लक्षात आल्याने कापूस आणि मका पिकाचा विमा काढण्यात शेतकऱ्यांत उदासीनता दिसून येत आहे. - अप्पासाहेब नलावडे, शेतकरी, कानडगाव