उद्योजक व्हायचंय ? मग इथे घ्या मोफत तांत्रिक प्रशिक्षण
By साहेबराव हिवराळे | Published: October 13, 2023 05:54 PM2023-10-13T17:54:46+5:302023-10-13T17:56:14+5:30
नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण सर्वांना घेता येणार
छत्रपती संभाजीनगर : स्वत:चा व्यवसाय उत्तमरीत्या कसा उभा करावा? तांत्रिक ज्ञान नसेल तर कसे होणार, असे प्रश्न युवकांसमोर असतात. यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण राबविले जात आहे.
सर्वसाधारण, एस.सी. प्रवर्गातील युवक-युवती, महिला अशा सर्वांनाच हे प्रशिक्षण घेता येईल. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्रातर्फे तालुकानिहाय मोफत तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती व फॅशन डिझायनिंग, डिजिटल फोटोग्राफी, गारमेंट मेकिंग, कापडी आणि कागदी पिशवी तयार करणे, डीटीपी, ब्युटी पार्लर, अन्नप्रक्रिया आदींचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अनुसूचित जाती, विशेष घटक प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रशिक्षण मोफत असून, या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी डी. यु. थावरे, महाव्यवस्थापक के. व्ही. खरात, सचिन घडमोडे, आदींनी केले आहे. प्रशिक्षणासाठी किमान पात्रता सातवी पास आहे.
चांगले उद्योजक तयार व्हावेत
तांत्रिक प्रशिक्षण एक महिना मोफत देण्यात येणार आहे. त्यातून चांगले उद्योजक तयार व्हावेत, ही अपेक्षा आहे.
- प्रतिभा निमकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण
तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण राबविले जात आहे. त्यासाठी केवळ आठवड्याचेच प्रशिक्षण गरजेचे आहे. त्यातून उद्योग वृद्धिंगत कसा करावा, हे ज्ञान देण्यात येते. प्रत्यक्ष भेटून अधिक माहिती घेता येईल.
- अनिल गायकवाड, कार्यक्रम समन्वयक