छत्रपती संभाजीनगरातून बँकाॅकला जायचंय? थोडं थांबा ! 

By संतोष हिरेमठ | Published: July 11, 2024 04:02 PM2024-07-11T16:02:30+5:302024-07-11T16:02:58+5:30

इमिग्रेशन, ‘कस्टम’ सुविधेची प्रतीक्षाच; ३१ जुलैपर्यंत ही सुविधा झाली तरच ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय ‘उड्डाण’

Want to go to Bangkok from Chhatrapati Sambhajinagar? Wait a little!  | छत्रपती संभाजीनगरातून बँकाॅकला जायचंय? थोडं थांबा ! 

छत्रपती संभाजीनगरातून बँकाॅकला जायचंय? थोडं थांबा ! 

छत्रपती संभाजीनगर : शहरातून ऑक्टोबरपासून बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी एअर एशिया एअरलाइन्सने केली आहे. मात्र, विमानतळावर इमिग्रेशन आणि ‘कस्टम’ची सुविधा ३१ जुलैपर्यंत सुरू झाली तरच ऑक्टोबरपासून बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू होऊ शकते. त्यामुळे या दोन्ही सुविधांसाठी विमानतळ प्राधिकरणाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

एअर एशियाच्या टीमने यापूर्वी मे महिन्याच्या प्रारंभी विमानतळाला भेट दिली होती. त्यानंतर जूनच्या प्रारंभी या एअरलाइन्सच्या टीमने शहराला पुन्हा भेट दिली. या टीमने विमानतळाच्या पहिल्या मजल्यावरील पायाभूत सुविधांची तपशीलवार तपासणी केली. कारण पहिल्या मजल्यावरील विमानतळाची पायाभूत सुविधा केवळ एअरलाइन्सच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्ससाठी राखीव आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या दृष्टीने सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, इमिग्रेशन, ‘कस्टम’ सुविधेत बँकाॅकच्या विमानसेवेसाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची परिस्थिती आहे. चिकलठाणा विमानतळाचे संचालक शरद येवले यांच्यासाठी या सुविधेसाठी पाठपुरावा सुरू आहे.

इमिग्रेशन, ‘कस्टम’ सुविधेत काय? 
विमानतळावर इमिग्रेशन सुविधा हा प्रक्रियेचा भाग आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांचे पासपोर्ट आणि विविध कागदपत्रे तपासली जातात. तर ''कस्टम्स'' सुविधेत कस्टम्स अधिकारी परदेशी नागरिकांकडील सामानांसह विविध बाबींची तपासणी करतात. त्यासाठी आवश्यक असलेली स्कॅनिंग, एक्स-रे मशीन असते.

इमिग्रेशननंतर अडीच महिने
विमानतळावर इमिग्रेशन आणि ‘कस्टम’ची सुविधा सुरू झाल्यानंतर अडीच महिन्यांनी एअर एशियाकडून बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू केली जाणार आहे. ३१ जुलैपर्यंत इमिग्रेशन आणि ‘कस्टम’ची सुविधा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. त्यात थोडा उशीर झाला तरीही ऑक्टोबर अखेरपासून बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू होऊ शकेल.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी- टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)

Web Title: Want to go to Bangkok from Chhatrapati Sambhajinagar? Wait a little! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.