नागरी समस्यांची तक्रार करायची आहे, महापालिकेने सुरु केली २४ तास हेल्पलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 12:00 PM2022-07-05T12:00:23+5:302022-07-05T12:01:05+5:30
या हेल्पलाइनवर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे इ. प्रश्नांसाठी व मदतीसाठी फोन करू शकतात.
औरंगाबाद : महापालिकेशी निगडित विविध नागरी समस्यांची तक्रार कुठे करावी, हा मोठा प्रश्न होता. स्मार्ट सिटीमार्फत २४ तास सुरू राहणारे हेल्पलाइन सेंटर सोमवारपासून सुरू करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली. या सेवेचा शुभारंभ सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आला.
महापालिकेशी निगडित कोणत्याही तक्रारी आता नागरिकांना हेल्पलाइनवर करता येतील. नागरिक कुठल्याही वेळी ०८०६९०९२२०० या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात. पाण्डेय यांनी स्वतः या हेल्पलाइनवर संपर्क साधून चाचणी केली. या हेल्पलाइनवर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे इ. प्रश्नांसाठी व मदतीसाठी फोन करू शकतात. तक्रारींची ऑनलाइन नोंद करून घेतली जाईल, असे स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी सांगितले. ठरावीक वेळेत तक्रारींचे निवारण झाले नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ती समस्या जाईल.
शुभारंभास स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उपायुक्त संतोष टेंगळे, नगररचना विभाग प्रमुख ए. बी. देशमुख, उपायुक्त नंदा गायकवाड, उपायुक्त सोमनाथ जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी, आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, प्रकल्प सहयोगी किरण आढे, माध्यम विश्लेषक अर्पिता शरद उपस्थित होते.