देवगिरी किल्ला पाहायचा? मग काडीपेटी, सिगारेट बाहेरच टाका !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:24 IST2025-04-16T13:22:31+5:302025-04-16T13:24:02+5:30
पुरातत्त्व सर्वेक्षणकडून प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी

देवगिरी किल्ला पाहायचा? मग काडीपेटी, सिगारेट बाहेरच टाका !
छत्रपती संभाजीनगर : तुम्ही जर देवगिरी (दौलताबाद) किल्ला पाहण्यासाठी जात असाल आणि तुमच्या खिशात सिगारेट, काडीपेटी असेल तर तुम्हाला हे सगळे फेकून द्यावे लागेल. तरच तुम्हाला प्रवेश मिळेल. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून देवगिरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांकडील सिगारेट, तंबाखू, काडीपेटी, लायटर काढून घेतल्यानंतर आत प्रवेश दिला जात आहे.
देवगिरी किल्ल्यावर ८ एप्रिल रोजी भीषण आग लागली होती. या आगीने किल्ल्याचा परिसर काळवंडला. या घटनेनंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून किल्ल्यावर प्रवेश करणाऱ्यांकडे सिगारेट, काडीपेटी, लायटर, तंबाखू असणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. यासाठी प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक पर्यटकांची तपासणी करीत आहेत. कुणाकडे सिगारेट, काडीपेटी, लायटर, तंबाखूची पाकिटे असतील तर ती जमा करून घेतली जात आहेत आणि त्यानंतरच पर्यटकांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशद्वारावर सिगारेट, काडीपेटी, लायटर, तंबाखूने बाॅक्स भरून जात असल्याची स्थिती आहे.
आणखी उपाययोजना करू
किल्ल्यावर मी पाहणी केली आहे. झाडेझुडपे जळाली. केवळ बारादरीतील काही लाकडी भाग जळाला. उर्वरित कुठेही काही नुकसान झालेले नाही. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी करून सिगारेट, काडीपेटी, तंबाखू काढून घेणे सुरू केले आहे. किल्ल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने आणखी उपाययोजना केल्या जातील.
- डाॅ. शिवकुमार भगत, अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद), भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण