पितळखोरा लेणी पाहायची? गौताळा अभयारण्य बंद, मग जीव मुठीत घ्या अन् पायी जा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 08:00 PM2024-08-10T20:00:37+5:302024-08-10T20:00:46+5:30

गौताळा अभयारण्य बंद, पण लेणी सुरू : प्रवेशद्वारापासून जवळपास ६०० मीटर अंतर पायी जाण्याची वेळ

Want to see Pitalkhora Caves? Then take life in hand and go on foot! | पितळखोरा लेणी पाहायची? गौताळा अभयारण्य बंद, मग जीव मुठीत घ्या अन् पायी जा!

पितळखोरा लेणी पाहायची? गौताळा अभयारण्य बंद, मग जीव मुठीत घ्या अन् पायी जा!

छत्रपती संभाजीनगर : पितळखोरा लेणी पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना सध्या जीव मुठीत घेऊन पायीच ही लेणी गाठावी लागत आहे. कारण वन्यजीव हल्ला करण्याच्या भीतीने गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी, पितळखोरा लेणीकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रवेशद्वार पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास ६०० मीटर अंतर पायी गेल्यानंतर शेकडो पायऱ्या उतरण्याची कसरत पर्यटकांना करावी लागत आहे.

कन्नडजवळील पितळखोरा लेणी ही जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांपेक्षाही प्राचीन आहे. जुलैच्या प्रारंभी गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वन्यजीव हल्ला करण्याची भीती आणि वनसंपदेची निगा यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पितळखोरा लेणीकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रवेशद्वार बंद करण्यात आले. या ठिकाणापर्यंत पर्यटक वाहनांनी येतात; परंतु त्यांना पुढे वाहन घेऊन जाता येत नाही. त्यामुळे प्रवेशद्वारासमाेर वाहन उभे करून पर्यटक पायीच पितळखोरा लेणीकडे जात असल्याची परिस्थिती आहे.

सुरक्षारक्षकाचा अभाव
ही चिंतेची बाब असून, कोणतीही घटना घडू नये यासाठी वन व पुरातत्त्व विभागाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. पितळखोरा लेणी परिसरात सुरक्षारक्षकांचाही अभाव दिसतो, असे पर्यटकांनी म्हटले.

वन्यप्राण्यांची भीती
प्रवेशद्वारापासून लेणीपर्यंतचे ६०० मीटर अंतर पायी जावे लागत आहे. त्यानंतर पायऱ्या उतराव्या लागतात. प्रवेशद्वारापासून लेणीकडे पायी जाताना वन्यप्राणी हल्ला करण्याची भीती नाकारता येत नाही. अभयारण्य बंद केले; पण पर्यटक पायी जात आहेत. त्यातून धोका नाकारता येत नाही. गौताळा अभयारण्य बंद; पण लेणी सुरू, अशी अवस्था पर्यटकांसाठी धोकादायक आहे.
- मिर्झा तकी

रस्ता बंद नव्हे, तर १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटनाला बंदी
पितळखोरा परिसरातील रस्ता बंद केलेला नाही. १५ सप्टेंबरपर्यंत वन्यजीवांना अडथळा नको व त्यांच्याकडून पर्यटकांवर हल्लेही होऊ शकतात. खबरदारी म्हणून वन्यजीव विभागाने हे जाहीर केलेले आहे. याची जाणीव असावी.
- अभय अटकळ, वन्यजीव विभाग

Web Title: Want to see Pitalkhora Caves? Then take life in hand and go on foot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.