दिवाळीची खरेदी आताच करायची का? तूर, मुगासह सर्व डाळी महाग
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 31, 2023 05:38 PM2023-08-31T17:38:03+5:302023-08-31T17:39:25+5:30
ही महागाई दिवाळीपर्यंत किती उंचावर घेऊन जाते, याची कल्पना नाही.
छत्रपती संभाजीनगर : पावसाने प्रदीर्घ दडी मारली आहे. या तीन महिन्यांत मुसळधार पाऊस बरसलाच नाही. आता सर्व आशा परतीच्या पावसावर आहेत. पावसाअभावी पिके माना टाकत आहेत. भविष्यातील पिकांची शाश्वती नाही. अशा परिस्थितीने तेजीला हवा मिळाली असून डाळींचे भाव वधारले आहेत. ही महागाई दिवाळीपर्यंत किती उंचावर घेऊन जाते, याची कल्पना नाही. दिवाळीत होणारी डाळींची खरेदी आताच करायची काय, असे प्रश्न सर्वसामान्य ग्राहक व्यापाऱ्यांना विचारत आहेत.
म्हणून वाढले दर
जून, जुलै व आता ऑगस्ट महिना संपत आला आहे. यंदा मराठवाड्यावर वरुणराजा रुसला आहे. यामुळेच मोठा पाऊस तीन महिन्यांत एकदाही पडला नाही. विहिरी खोल गेल्या आहेत. बोअरचे पाणी आटले आहे. शेतातील पिके वाळली आहेत. मूग हातातून गेला आहे. यामुळे आता हळूहळू मूग डाळीचे भाव वधारू लागले आहेत, तसेच तूर डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळीच्या भावातही तीन महिन्यांत वाढ झाली आहे.
कमी पावसामुळे आणखी वाढणार दर
आता सर्व मदार परतीच्या पावसावर आहे. परतीचा पाऊस चांगला झाला तरी खरिपाची पिके हातातून गेल्यात जमा आहेत. आता राजस्थानातून डाळी आणाव्या लागतील, अशी परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास दिवाळीपर्यंत तूर डाळ १९० रुपये, हरभरा डाळ १०० रुपये, उडीद डाळ व मूग डाळ १५० रुपये, तर मसूर डाळ १०० रुपयांपर्यंत विक्री होईल. सरकारने विदेशातून डाळी आयात केल्या तर भाव थोडे स्थिर राहू शकतात.
- श्रीकांत खटोड,व्यापारी
डाळींच्या किमती वाढल्या (प्रति किलो)
डाळीचे प्रकार जून महिन्यात सध्याचे दर
तूर ११० रुपये -- १५५ रुपये
हरभरा ६४ रुपये---८० रुपये
उडीद १०२ रुपये---११२ रुपये
मूग ११० रुपये--- ११२ रुपये
मसूर ८६ रुपये---९० रुपये