नकाशाआधारेच प्रभाग आरक्षण..!
By Admin | Published: June 6, 2016 12:02 AM2016-06-06T00:02:23+5:302016-06-06T00:19:07+5:30
भोकरदन : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या प्रभागाचे आरक्षण हे गुगल नकाशाआधारेच करण्यात येणार असल्याचे विभागीय उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले़
भोकरदन : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या प्रभागाचे आरक्षण हे गुगल नकाशाआधारेच करण्यात येणार असल्याचे विभागीय उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले़ ते भोकरदन दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
नगरपरिषदेच्या प्रभाग आरक्षणासोबतच शहरातील पाणी टंचाईचा मुख्याधिकारी रफीक सय्यद यांच्याकडून आढावा घेतला. तसेच तहसील कार्यालयात तहसिलदार रूपा चिंत्रक यांच्यासह कर्मचाऱ्याची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुष्काळ व पाणी टंचाईच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज आहे.
या टंचाईच्या काळात मजुरांना काम, तसेच नागरिकांना टँकरद्वारे करण्यात येत असलेला पाणी पुरवठा व्यवस्थीत आहे की नाही याचा आढावा फड यांनी घेतला़ त्यानंतर ब मुख्याधिकारी रफीक सय्यद यांंच्याकडून नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेनुसार शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रभाग पाडण्याच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
नगराध्यक्षपदाचे यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणच कायम राहणार आहे की नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे, याबाबत फड म्हणाले, हा निर्णय शासनाचा आहे. त्यामुळे आपणाला याबाबत काही सांगता येणार नाही. मात्र, सध्या तरी पूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या आधारेच निवडणुकीचे काम सुरू असल्याचे विजयकुमार फड यांनी स्पष्ट केले.
न.प.मध्ये १७ नगरसेवकाची संख्या आहे. सात प्रभागांत प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून द्यावे लागतील तर ८ व्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून जातील. नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून करण्यात येणार असल्याने या निवडणुकीमध्ये नगरसेवकाचे महत्व कमी होण्याची शक्यता असल्याने चर्चा रंगत आहे़