ट्रान्सपोर्टचे गोदाम फोडून दीड लाखाचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:19 PM2019-07-23T23:19:46+5:302019-07-23T23:19:56+5:30
गोदाम फोडून दुचाकीचे टायर, महागडे कपडे व अॅटो पार्टचे बॉक्स असा जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.
वाळूज महानगर : बजाजनगर येथील गोदाम फोडून दुचाकीचे टायर, महागडे कपडे व अॅटो पार्टचे बॉक्स असा जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
बजाजनगरातील प्लॉट नं. एक्स- ७५ येथे गणेश बबनराव अंबाडे यांचे ट्रान्सपोर्टचे गोदाम आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचा माल या गोदामात येतो. त्यानंतर येथून संबंधित कंपन्यांचा सदर माल पोहच केला जातो. शुक्रवारी रात्री ९ वाजता अंबाडे हे गोदाम बंद करुन घरी गेले. दरम्यान, शनिवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास गोदाम फोडल्याचे निदर्शनास आले.
अंबाडे यांनी घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दुचाकीचे ४४ टायर, ब्रँडेड कपड्यांचे दोन बॉक्स व अॅटो पार्टचे दोन बॉक्स आदी १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज गायब असल्याचे दिसून आले. दरम्यान सोमवारी पोलिसांनी घटनास्थळासह सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या संदर्भात गणेश अंबाडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
पोलिसांत तक्रार मात्र गुन्हा दाखल नाही
ट्रान्सपोर्टच्या गोदामातून दीड लाखाचा माल चोरी गेल्यानंतर मालक गणेश अंबाडे यांनी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेटही दिली आहे. घटना घडून तीन दिवस उलटले तरी अद्याप या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.