दिंडीसोबत डोक्यावर औषधे घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची वारी; नेमणुकीचा आनंद पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:35 PM2022-06-24T18:35:37+5:302022-06-24T18:36:23+5:30
‘तुम्ही कसेही जा, पण गरज पडल्यास वारकऱ्यांवर प्रथमाेपचार करा.'
औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून पंढरपूरला पायी जाणाऱ्या २४ दिंड्यांसोबत जिल्हा परिषदेचे आरोग्य सेवक डोक्यावर औषधांचे गाठोडे आणि दैनंदिन वापराचे कपडे घेऊन गुरुवारी वारीला निघाल्याचे पाहायला मिळाले.
आरोग्य विभागाने औषधे नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था न केल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध संत, महंताच्या २४ दिंड्या वारीला निघाल्या आहेत. या दिंड्यांतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक दिंडीसोबत एक आरोग्यसेवक नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. विविध प्रकारची औषधे देण्यात आली. या औषधांच्या साठ्यासह खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराचे कपडेही नेणे आवश्यक असते, हे लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांनी ही औषधे कशी घेऊन जावीत, याची व्यवस्था प्रशासनाने केली नाही.
आतापासून १२ जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांना वारीत राहावे लागणार आहे. सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्याने औषधे पावसात भिजू शकतात. मात्र आरोग्य विभागाने वाहन देण्यासाठी निधीची तरतूद नसल्याचे स्पष्ट करीत ‘तुम्ही कसेही जा, पण गरज पडल्यास वारकऱ्यांवर प्रथमाेपचार करा. १०८ रुग्णवाहिकेची मदत घ्या, तेथील जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवा,’ असे सांगून त्यांना रवाना केले.
नेमणुकीचा आनंद; पण...
दिंडीसोबत पायी निघालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिंडीसोबत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने आमची नेमणूक केली, याचा आनंद आहे. मात्र आमचे वय ५०च्या आसपास आहे. औषधांचे गाठोडे डोक्यावर घेऊन आम्ही अन्य वारकऱ्यांप्रमाणे रोज चालू शकत नाही. शिवाय पावसाळा असल्याने औषधे भिजू शकतात. गर्दीत औषधांचा बॉक्स पडू शकतो, याचा विचार प्रशासनाने केला नाही.