नाथ मंदिर परिसरातून वारकरी महिलेची पर्स हिसकावली; चोरटे दुचाकीवरून पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 04:44 PM2023-03-08T16:44:11+5:302023-03-08T16:44:40+5:30
हेल्मेट घातलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद....
पैठण : नाथ मंदिर परिसरात देवदर्शनासाठी आलेल्या वारकरी महिलेची पर्स मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर हेल्मेट घालून आलेल्या दोन भामट्यांनी बळजबरीने हिसकावून घेतली. दरम्यान दोघेही चोरटे मंदीरापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्हीच्या कँमेऱ्यात कैद झाले आहेत.
धुलीवंदनानिमित्त मंगळवारी चौका चौकात पोलीस बंदोबस्त असताना दिवसाढवळ्या मंदिर परिसरात वारकरी महिलेच्या पर्स चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नाथषष्ठी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिल्याची चर्चा शहरात होत आहे. सुनंदा मधुकर रोटे (५०) रा नसीराबाद जिल्हा जळगाव, या महीला वारकरी दिंडी सोबत देवदर्शनासाठी पैठण येथे आल्या होत्या. पैठण येथील नाथ समाधी मंदीर परीसरात फिरत असताना मोटरसायकल वरील हेल्मेट घातलेल्या दोन तरुणांनी अचानक जवळ येत सुनंदाबाईच्या हातातील पर्स हिसकावून घेतली. चोरटे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळून गेल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पर्समध्ये ८ हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल असा २० हजार रूपयांचा ऐवज होता.
सुनंदा रोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाणे अंमलदार गोपाळ पाटील यांनी अज्ञात चोरट्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिश भोसले, सुधीर वाव्हळ, मनोज वैद्य, आदी चोरट्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस ठाण्याचा प्रभारी कारभार
नाथषष्ठी यात्रेत जालना, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील चोरटे सहभागी होऊन चोऱ्या करतात असा अनुभव आहे. दरवर्षी पोलीस यंत्रणेस या चोरट्यावर नजर ठेवावी लागते. यंदा नाथषष्ठीच्या तोंडावर नाथ मंदीर परिसरात चोरी करून पोलीसांना सलामी दिली आहे. त्यातच पैठण पोलीस ठाण्याचा प्रभारी कारभार आहे. यामुळे चोरट्यावर धाक व वचक राहणार नसल्याने सदरच्या घटनेमुळे भाविक व वारकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.