वाळूज महानगरमध्ये उबदार कपड्यांनी दुकाने सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 06:06 PM2018-11-17T18:06:11+5:302018-11-17T18:06:28+5:30
वाळूज महानगर : हिवाळ्याची चाहूल लागताच विक्रेत्यांनी वाळूज महानगरात महामार्गालगत उबदार कपड्यांचे स्टॉल्स थाटले आहेत. आठवडाभरापासून वातावरणात बदल झाल्याने ...
वाळूज महानगर : हिवाळ्याची चाहूल लागताच विक्रेत्यांनी वाळूज महानगरात महामार्गालगत उबदार कपड्यांचे स्टॉल्स थाटले आहेत. आठवडाभरापासून वातावरणात बदल झाल्याने हवेत गारवा वाढला आहे. पण अजून गुलाबी थंडीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे विके्रत्यांना ग्राहकाबरोबरच कडक थंडीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
हिवाळ्याला सुरुवात होताच परराज्यातील उबदार कपडे विक्रेते वाळूज महानगरात जवळपास ४ महिने कपड्याची दुकाने मांडून बसतात. यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने परिसरातील बहुतांश जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे हिवाळा सुरु होऊनही अजून थंडीचा जोर वाढलेला नाही. मात्र, तरीही राज्यस्थान, मध्यप्रदेश येथील विक्रेत्यांनी औरंगाबाद-नगर महामार्गावर कामगार चौकालगत उबदार कपड्यांचे स्टॉल्स थाटले आहेत.
या ठिकाणी जवळपास ४० पेक्षा अधिक विक्रेत्यांचे स्टॉल्स असून, स्वेटर, रग, ब्लँकेट, जॅकेट, कान टोप्या, हात मोजे आदी उबदार कपडे विक्रीला सुरुवात केली आहे. मागील आठवडाभरापासून वातावरणात बदल झाला असून तापमानातही घट झाली आहे. दिवसा कडक उन्ह पडत असून, रात्रीच्या वेळी थंडी पडायला सुरुवात झाली आहे.
पण अजून म्हणावी तशी थंडी जाणवत नाही. तरीही रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वाराला थंडीचा चांगलाच अनुभव येत आहे. गुलाबी थंडी सुरु न झाल्याने नागरिकांकडूनही उबदार कपडे खरेदीसाठी प्रतिसाद मिळत नाही. तरीही थंडीला सुरुवात होत असल्याने अनेक नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे, कानपट्टी, जॅकेट, शाल आदी उबदार कपडे खरेदी करताना दिसत आहेत. फॅन्सी जॅकेट व कानपट्टीला तरुण वर्गातून मोठी मागणी होत आहे. बहुतांशी वाहनधारक स्वेटर व जॅकेटला पसंदी देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
विक्रेत्यांना कडक थंडीची प्रतीक्षा ..
यंदा कपड्याच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली तरीही मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करुन दुकाने थाटली आहेत. थंडी वाढली की लोक खरेदीसाठी गर्दी करतात. त्यामुळे आम्ही कडक थंडीची प्रतिक्षा करीत आहोत, असे कनिराम गरासिया, कालुराम बंजारा, राहुल सुरावत, रोडमल राठौर आदींनी सांगितले.