लाट उष्णतेची...!
By Admin | Published: May 18, 2016 12:06 AM2016-05-18T00:06:57+5:302016-05-18T00:17:41+5:30
औरंगाबाद : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या सूचनांनुसार १७ ते २१ मे या कालावधीत औरंगाबादसह विभागात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या सूचनांनुसार १७ ते २१ मे या कालावधीत औरंगाबादसह विभागात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. मंगळवारी लाटेच्या पहिल्या दिवशीच कडक ऊन पडल्यामुळे शहरात दुपारच्या वेळी कमी वर्दळ असल्याचे दिसून आले. सूर्य सरळ रेषेत आल्याने नागरिकांचे उष्णतेमुळे हाल होत आहेत.
उष्णतेची लाट येण्याची शक्यता विभागीय आणि जिल्हा प्रशासनाने हवामान खात्याच्या, महसूल व वन विभागाच्या परिपत्रकावरून वर्तविली आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात फिरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दोन दिवसांपासून मराठवाड्यात ४२ अंश सेल्शिअसपर्यंत पारा चढतो आहे. १७ ते २१ मेदरम्यान तापमान यापुढे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉही, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी केले आहे.
उष्णतेमुळे तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, हॅट, बूट, चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. जर कुणी बाहेर उन्हात काम करीत असेल, तर हॅट किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या (पान २ वर)
तापमान ४२.२ अंशावर; किमान तापमानातही वाढ
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार औरंगाबादेत उष्णतेची लाट येऊन धडकली आहे. सूर्याने प्रखरतेने आग ओकणे सुरू केले आहे. त्यामुळे मंगळवारी शहराचे कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. किमान तापमानातही मोठी वाढ नोंदली गेली. हवेतील कोरडेपणामुळे दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या. शहराच्या दैनंदिन व्यवहारावरही त्याचा परिणाम दिसून आला.
सध्या सूर्य पृथ्वीच्या मध्यावर म्हणजेच विषुववृत्तावर येत आहे. म्हणून पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे. याच कारणामुळे शहरातील उन्हाचा पारा वाढला आहे. सकाळपासूनच सूर्यकिरणांची प्रखरता जाणवत होती.
सकाळी ११ वाजेनंतर उन्हाचा कडाका खूपच वाढला. वातावरणातील आर्द्रताही कमी झाली होती. त्यामुळे उष्ण वारे वाहत होते. त्यामुळे बहुतेक नागरिकांनी उन्हात बाहेर पडणे टाळले. परिणामी, दुपारच्या वेळी शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसत होते. प्रमुख रस्त्यांवरील वाहतूकही रोडावली होती. बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. जे काही थोडे लोक बाहेर फिरत होते त्यांनीही उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, रुमाल, टोपी घातलेली दिसत होती.
तापमान वाढल्यामुळे अनेक ठिकाणी दुपारच्या वेळी रस्त्यावरील डांबर वितळले. औरंगपुरा, पैठणगेट, गुलमंडी, निराला बाजार, कॅनॉट गार्डन, टीव्ही सेंटर, एमटू, पुंडलिकनगर रोड आदी भागांतील बाजारपेठाही ग्राहकांच्या प्रतीक्षेत होत्या.
उन्हाचा हा कडाका सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम होता. चिकलठाणा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी शहराचे कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर किमान तापमानही ३० अंशांच्या पुढे गेले.
मंगळवारी किमान तापमान ३०.१ अंश इतके नोंदले गेले. उष्णतेची ही लाट येत्या तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.