औरंगजेब कबरीबाबत इशारा; मिलिंद एकबोटे आणि समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:00 IST2025-03-15T12:59:29+5:302025-03-15T13:00:16+5:30
अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हाबंदी काढले आहेत.

औरंगजेब कबरीबाबत इशारा; मिलिंद एकबोटे आणि समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी
छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा माजी आमदार तथा धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी दिला आहे. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून माजी आमदार एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत जिल्हाबंदी करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी "छावा' चित्रपट प्रदर्शित झालेला असून सदर चित्रपटामुळे मराठा समाज व हिंदू धर्मातील लोकांच्या औरंगजेबाच्या कबरीबाबत भावना तिव्र झालेल्या आहेत. त्याबाबत सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणावर आक्रोश पहावयास मिळत आहे. तसेच दिनांक १७ मार्च पासून बजरंग दल व विश्व हिंदू परिषद संघटनेने औरंगजेब याची कबर हटवावी यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलेला आहे. यातच माजी आमदार मिलिंद एकबोटे यांनी देखील कबर नष्ट करण्याचा इशारा दिलेला आहे. दरम्यान, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण, हिंदू एकता मोर्चा, समस्त हिंदू आघाडी, शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलन यांचेकडून दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी वढू- तुळापूर येथे संभाजी महाराज श्रद्धांजली यात्रा रॅली काढली जाते. तसेच संभाजी महाराज यांचे पुण्यतिथीनिमीत्त वढू-तुळापूर येथे हजारो कार्यकर्ते जमा होवून महाराजांना मानवंदना देतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही २९ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त मोठ्या प्रमाणावर माजी आमदार मिलिंद एकबोटे व त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते, सदस्य व समर्थक लोक जमा होणार असून तेथून संभाजी महाराज यांना मानवंदना दिल्यानंतर ते खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनास मिळाली आहे. यावरून माजी आमदार एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत बंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यानी दिले आहेत.
पोलिस अहवालात काय?
पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी अहवालात नमूद केले आहे की, मिलिंद एकबोटे हे अत्यंत कडवट हिंदूत्ववादी कार्यकर्ते असून त्यांचेवर भिमा कोरेगाव दंगलीत सहभागी असल्याचा व इतर धर्मियांच्या, समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांनी प्रतापगडावरिल अफजलखान कबर हटवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. तसेच त्यांचे संघटनेचे अनेक सदस्य व सक्रीय कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यात आहेत. गोपनिय माहितीनुसार जर सदर लोक तुळापूर वरून खुलताबाद येथे यायला निघाले तर हिंदूत्वावादी संघटनांचे अनेक सक्रीय सदस्य, कार्यकर्ते व कट्टर हिंदू लोक त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना चालू आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन देखील चालू असून सदर आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे हिंसक पडसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटण्याची दाट शक्यता असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(1) अन्वये मिलिंद रमाकांत एकबोटे, माजी आमदार तथा अध्यक्ष "धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण", "हिंदू एकता मोर्चा", "समस्त हिंदू आघाडी", "शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलन" यांना व त्यांच्या समर्थकांना दिनांक १६ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा हद्दीमध्ये प्रवेश करण्याबाबत मनाई आदेश निर्गमित करण्याची विनंती अहवालातून करण्यात आली. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी खिराळकर यांनी जिल्हाबंदी आदेश काढले आहेत.