मॉब लिंचिंग नव्हे, ते तर रस्त्यावर झालेले भांडण : चिरंजीव प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 07:47 PM2019-07-24T19:47:16+5:302019-07-24T19:51:20+5:30
घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करणार
औरंगाबाद : शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. रस्त्यावर झालेल्या भांडणाला मॉब लिंचिंगचा रंग देऊन जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिला.
रस्त्यावर वाहनचालकांत झालेल्या शाब्दिक चकमकीवरून हा वाद झाला; परंतु लोकांना जमवून या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. यात कुणावरही अन्याय होणार नाही; परंतु अपवृत्तीचे लोक पोलिसांच्या नजरेत आल्यास त्यांना पोलीस सोडणार नसल्याचे आयुक्त प्रसाद म्हणाले.
आझाद चौकातील जमाव पोलिसांनी पांगविला; परंतु काहींनी हेतुपुरस्सरपणे लोकांना बोलावून दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता. एकाच बाजूला जमाव होता, तर दुसऱ्या बाजूला कोणतीही गर्दी नव्हती. याविषयीदेखील आजूबाजूच्या घटना त्यामागील कोण, याविषयीची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत. फिर्यादीच्या पुरवणी जबाबाविषयी विचारले असता त्यावर सध्या बोलणे योग्य नसून, तो माझ्याकडे आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दीडशे अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल
आझाद चौक ते रोशनगेट रोडवर काहीजण घोषणा देत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत होते. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून जिन्सी पोलीस ठाण्यात जवळपास १५० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल व व्हिडिओ चित्रीकरणात आलेल्या लोकांचे चेहरे ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज केले हस्तगत
आझाद चौकात झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून, यामध्ये फिर्यादी व आरोपी यांचा केवळ १ मिनिटाचा संवाद झाल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळावर असलेल्या व्यक्तींकडून माहिती गोळा करण्यात येत असून, यामध्ये खोटी तक्रार अथवा बनाव असल्याचे सिद्ध झाल्यास खोटी तक्रार देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त प्रसाद यांनी दिला आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
गेल्या काही दिवसांपासून यू-ट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अफवा पसरविणाऱ्या व्हिडिओवर शहरवासीयांनी विश्वास ठेवू नये. नागरिकांनी पोलिसांकडे आलेल्या व्हिडिओची शहानिशा करावी. खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
फूड डिलिव्हरला नोटीस देणार
शहरात व्यसनाधीनता वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याने त्याकडे पहिल्यांदा लक्ष केंद्रित करून हॉटेल, बीअरबार बंदीचे काम सोमवारपासून सुरू केले आहे; परंतु रात्री उशिरापर्यंत फूड डिलिव्हरी करणाऱ्यांची शहरात वर्दळ असते. यासाठी त्यांनीही रात्री उशिराच्या फूड डिलिव्हरीची आॅर्डर घेऊ नयेत, यासाठी त्यांची बैठक घेऊन त्यांनाही नोटिसा देणार आहोत. रात्री गुन्हेगारीच्या प्रकारात वाढ होत असल्याने हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. रस्त्यावर गस्तीपथके लक्ष ठेवून राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.