वैजापुरात कचऱ्याच्या जागा बनल्या स्वच्छ-सुंदर 'सेल्फ़ी पॉइंट'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 08:37 PM2019-01-11T20:37:32+5:302019-01-11T20:38:32+5:30
कचरा फेकणाऱ्या ठिकाणी सुशोभिकरण करुण स्वच्छता राखण्याचा संदेश देणारे 'सेल्फ़ी पॉइंट' उभारण्यात आले आहेत.
- मोबीन खान
वैजापुर (औरंगाबाद ) : आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी वैजापुर नगरपालिका नेहमीच पुढाकार घेतांना दिसून येत आहे.शहरातील उपक्रमामुळे राज्यस्तरावर वैजापुर नगरपालिकेचे नाव झळकले आहे. आता कचरा फेकणाऱ्या ठिकाणी सुशोभिकरण करुण स्वच्छता राखण्याचा संदेश देणारे 'सेल्फ़ी पॉइंट' उभारण्यात आले आहे.
शहर आपले आहे ते स्वच्छ ठेवा असा संदेश भिंतीवरील चित्रातून नागरिकांपर्यंत जाऊ लागला आहे.या उपक्रमास त्यांना विविध शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबतच युवकांचा सहभाग लाभत आहे.त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूकही केल्या जात आहे. यापूर्वी असा उपक्रम कोणी घेतला नसल्याने शहरात या उपक्रमाची जोरदार चर्चा होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेच्या निमित्ताने वैजापुर शहराच रुप हळुहळू बदलू लागल आहे. मुळातच सुंदर असणा-या या शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आता पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या निमित्ताने वैजापुरात अनेक स्तरांवर स्वच्छतेसह सौंदर्यीकरणाचीही कामे सुरु झाली.यात ठळकपणे जाणवणारे काम होते ते विविध ठिकाणच्या भिंतीवर सुंदर चित्रांच्या सहाय्याने दिलेले स्वच्छतेचे संदेश.नगराध्यक्ष शिल्पा परदेशी अणि मुख्याधिकारी विट्ठल डाके यांनी शहरातील पोस्ट ऑफिस,क्रांती चौक,फिश मार्केट,शनी मंदिर,जिल्हा परिषद शाळा परिसरात कचरा टाकणाऱ्या प्रमुख सहा चौकात अता स्वच्छतेचे संदेश देणारी सुंदर चित्रे व 'सेल्फ़ी पॉइंट' उभारले आहेत.नजरेला सुखावणारी व ख-या अर्थाने प्रत्येक वेळेस मनावर स्वच्छतेचा संदेश बिंबवणारी ही चित्रे वैजापुरकरांना सुखावत आहेत.