औरंगाबादेत विरोधाच्या ठिणगीनंतर कचऱ्याचा आगडोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:15 AM2018-04-29T00:15:30+5:302018-04-29T00:16:18+5:30
शहरात प्रक्रिया करण्यात आलेला कचरा हर्सूल सावंगी तलावाजवळ मागील दोन दिवसांपासून टाकण्यात येत आहे. शनिवारी सकाळी भाजप नगरसेवक पूनम बमणे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कचरा टाकण्यास कडाडून विरोध केला. वाहनांवर दगडफेक, अधिका-यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात प्रक्रिया करण्यात आलेला कचरा हर्सूल सावंगी तलावाजवळ मागील दोन दिवसांपासून टाकण्यात येत आहे. शनिवारी सकाळी भाजप नगरसेवक पूनम बमणे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कचरा टाकण्यास कडाडून विरोध केला.
वाहनांवर दगडफेक, अधिका-यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. विरोधाची ठिणगी पाडणा-यांवर गुन्हा दाखल करण्यास मनपा प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. सायंकाळी याच ठिकाणी मनपाने टाकलेल्या कच-याने पेट घेतल्याने परिसरात आगडोंब उसळला. मागील दोन महिन्यांपासून शहरात साचलेल्या कचºयावर केमिकल पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत होती. या कचºयापासून खतनिर्मिती, स्क्रिनिंग करण्यासाठी चार जागांची निवड केली आहे. सर्वप्रथम झाल्टा येथे एक हजार टन कचरा टाकण्यात आला. गुरुवारपासून हर्सूल येथे कचरा टाकण्यात येतोय.
शनिवारी सकाळी अचानक स्थानिक नगरसेवक पूनम बमणे यांनी कचरा टाकण्यास विरोध केला. ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतोय, तेथून जवळच गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे.
पावसाळ्यात पाणी दूषित होईल, कचºयावर केमिकल फवारणी करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बमणे यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके यांच्यासोबत हुज्जत घालत धक्काबुक्कीही केली. नगरसेवक समर्थक रहिम पटेल यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मनपाच्या वाहनांवर प्रचंड दगडफेक सुरू केली. वाढता विरोध लक्षात घेऊन २५ पेक्षा अधिक कचºयाची वाहने परत मध्यवर्ती जकात नाक्यावर आणण्यात आली.
महापालिकेत नंतर बैठक घेण्यात आली. उपमहापौर विजय औताडे, पूनम बमणे यांनी कचरा टाकण्यास विरोध दर्शविला. महापौरांनी दोघांची समजूत घातली.