औरंगाबादमधील कचऱ्याची अजूनही पाहणीच; राज्यस्तरीय समितीकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:22 PM2018-12-27T12:22:51+5:302018-12-27T12:25:55+5:30

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य शासनाकडूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे.

Waste disposal in Aurangabad still inspected; Review by the State-level Committee | औरंगाबादमधील कचऱ्याची अजूनही पाहणीच; राज्यस्तरीय समितीकडून आढावा

औरंगाबादमधील कचऱ्याची अजूनही पाहणीच; राज्यस्तरीय समितीकडून आढावा

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र शासनाचे पथक ५ जानेवारीनंतर येणारस्वच्छतागृहांचे लक्ष्य शंभर टक्के गाठण्याची सूचना 

औरंगाबाद : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाचे पाहणी पथक ५ जानेवारीनंतर शहरात दाखल होणार आहे. त्यापूर्वी महापालिकेने सार्वजनिक शौचालये, वैयक्तिक शौचालये, घनकचरा, स्वच्छता आदी क्षेत्रात किती काम केले याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी रात्री दोन सदस्यांचे राज्यस्तरीय पथक शहरात दाखल झाले. समितीने शहरातील विविध भागात जाऊन पाहणी केली. कचराकोंडीतही महापालिकेने दैनंदिन कचरा उचलण्याचे योग्य नियोजन केले आहे. त्यावर शंभर टक्के प्रक्रियाही करणे गरजेचे असल्याचे मत समितीने नोंदविले.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य शासनाकडूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. केंद्राच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय समितीकडूनही पाहणी करण्यात येते. यंदा लातूर येथील जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, परभणी महापालिकेच्या उपायुक्त विद्या गायकवाड यांनी औरंगाबाद शहराच्या पाहणीसाठी नेमणूक करण्यात आली. मंगळवारी रात्री समितीचे दोन्ही सदस्य शहरात दाखल झाले. त्यांनी रात्री १२ वाजेपर्यंत शहरातील व्यावसायिक भागात कचरा कशा पद्धतीने जमा करण्यात येतो. दुकाने बंद झाल्यावर कचरा कशा पद्धतीने उचलण्यात येतो, याची पाहणी केली. बुधवारी सकाळी ६ वाजेपासून पुन्हा समितीने पाहणीला सुरुवात केली.

केंद्र शासनाच्या अनुदानातून बांधलेल्या वैयक्तिक शौचालयांची पाहणी केली. मनपाने शहर १०० ओडीएफ फ्री (हगणदारीमुक्त) झाल्याची घोषणा केली आहे. समितीच्या मते अजून ३० टक्के काम करावे लागेल. समितीसोबत मनपाच्या घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे उपस्थित होते. समितीने कांचनवाडी येथील एसटीपी प्लांटची पाहणी केली. शहरात पूर्वी ज्या भागात कचऱ्याचे मोठमोठे डोंगर होते त्या भागात जाऊन पाहणी केली. कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत मनपाने बरीच प्रगती केली असली तरी प्रक्रियाही शंभर टक्के व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. समितीचा गोपनीय अहवाल लवकरच शासनाला सादर करण्यात येणार आहे. 

समितीच्या महत्त्वपूर्ण सूचना
शहरातील वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतागृहांची समितीने पाहणी केली. वैयक्तिक स्वच्छतागृहांचे टार्गेट शंभर टक्के  पूर्ण करण्याचे सूचित केले. सध्या पालिकेने केवळ ७० टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्ट गाठले आहे. महिला स्वच्छतागृहांची पाहणी करताना समितीने महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशीन बसवा, दिव्यांगांना खुर्चीसह जाण्यासाठी सुविधाही उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना केली.

या भागात केली पाहणी
मंगळवारी सायंकाळी आल्यानंतर या समितीने रात्रीला कचरा संकलन केल्या जाणाऱ्या औरंगपुरा, पुंडलिकनगर रोड, कॅनॉट प्लेस, रेल्वेस्टेशन येथे पाहणी करून नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधला. बुधवारी सकाळी पैठणगेट, गजानन महाराज मंदिर परिसर, औरंगपुरा येथील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी करण्यात आली.

Web Title: Waste disposal in Aurangabad still inspected; Review by the State-level Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.