मराठवाड्यातील १४५ मंडळात पाणीच पाणी; आठ दिवसांत ३१ जणांचा बळी, ३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 05:40 PM2021-09-09T17:40:23+5:302021-09-09T17:44:59+5:30
अनेक गावांचा संपर्क तुटला, दरडी कोसळणे, घरांची पडझड होणे, माणसे आणि जनावरे वाहून गेली.
औरंगाबाद : मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हाहाकार उडवून दिला. वार्षिक सरासरीपेक्षा ११९ मि.मी. पाऊस जास्त नोंदविला गेला आहे. ६७९ मि.मी.च्या तुलनेत ७९८ मि.मी. पाऊस विभागात आजवर झाला. ८ सप्टेंबर रोजी १४५ मंडळात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय अनेक गावांचा संपर्क तुटला, दरडी कोसळणे, घरांची पडझड होणे, माणसे आणि जनावरे वाहून गेली. ३ लाख हेक्टरच्या आसपास पिकांचे नुकसान झाल्याची नोंद विभागीय प्रशासनाने घेतली आहे.
आठ दिवसांत ३१ जणांचा बळी : ५ जणांचा शोध
औरंगाबाद ४, जालना ४, परभणी २, हिंगोली ४, नांदेड ७, बीड ५, लातूर ३, उस्मानाबाद २ अशा ३१ जणांचा बळी आठ दिवसांत पावसाने घेतला आहे. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसात वाहून गेलेल्या ५ जणांचा शोध सुरू आहे. २३ लहान-मोठी जनावरे पावसाने वाहून गेली. २३ ठिकाणी घरे पडली.
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. ४४ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सुमारे १ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील खरीप हंगामाच्या नुकसानाची प्राथमिक नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. अनेक ठिकाणी पाहणी, पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात एकाच दिवसात ८० मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस म्हणून नोंदला गेला. ५८१ मि.मी.च्या तुलनेत ६९६ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. ११९ टक्के हे प्रमाण आहे. कन्नड तालुक्यातील २ लघुतलाव फुटले असून त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या
जिल्हानिहाय पावसाचा तडाखा असा :
औरंगाबाद जिल्ह्यात ४४, जालन्यात १५, बीड २२, लातूर ६, उस्मानाबाद १, नांदेड ३१, परभणीतील २६ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जालन्यात १४१ टक्के, बीड १३३ टक्के, लातूर १०२ टक्के, उस्मानाबाद १०१ टक्के, नांदेड ११८ टक्के, परभणी ११५ टक्के, हिंगोली १०७ टक्के पाऊस झाला आहे. यापुढे होणारा पाऊस हा खरीप पिकांचे नुकसान करणाराच असेल.
मोठ्या प्रकल्पांची स्थिती अशी :
जायकवाडी ४७.९१ टक्के,
निम्न दुधना ९६.७० टक्के,
येलदरी १०० टक्के,
सिध्देश्वर ९९.४२ टक्के,
माजलगांव ९४.८७ टक्के,
मांजरा ६३.१० टक्के,
पैनगंगा ९२.८६ टक्के,
मानार १०० टक्के,
निम्न तेरणा ७०.१७ टक्के,
विष्णुपुरीत १०० टक्के,
सिना कोळेगांव ०.४६ टक्के