व्हॉल्व फोडल्याने पाणीपुरवठा बंद
By Admin | Published: August 9, 2015 12:14 AM2015-08-09T00:14:46+5:302015-08-09T00:29:52+5:30
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाणीसाठा तळाला गेल्याने पाणी घेण्यासाठी चढाओढ लागली आहे़ लातूरच्या चरातून शिराढोण
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाणीसाठा तळाला गेल्याने पाणी घेण्यासाठी चढाओढ लागली आहे़ लातूरच्या चरातून शिराढोण ग्रामपंचायतीचा पंप काढल्याने तेथील ग्रामस्थ संतापले आहेत़ शुक्रवारी शिराढोण येथे लातूरच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व फोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले़ परिणामी, दुरूस्तीसाठी दोन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे़
लातूरच्या पाणीटंचाईवर सजग असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपासून व्हॉल्व दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे़ शनिवारी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांना दुरूस्तीबाबत विचारणा केल्यावर त्यांनी काम सुरू आहे़ लवकरच पूर्ण होईल़ त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे उत्तर दिले़ शुक्रवारी सकाळी ११ वाजता शिराढोण येथे जलवाहिनीवरील व्हॉल्व फोडण्यात आला आहे़ त्यामुळे पुढे येणारे पाणी थांबले आहे़ ही बाब लक्षात आल्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद केला आहे़ अगोदरच पाण्यासाठी भटकंतीची वेळ आलेल्या नागरिकांना यामुळे पुन्हा टंचाईत भर पडली आहे़ महापालिका प्रशासन पाणीपुरवठ्यासाठी सजग असल्याचे सांगत असले तरी, ४८ तासांपासून व्हॉल्व दुरूस्त झाला नसल्याने शनिवारी टँकरलाही पाण्यासाठी ‘वेटिंग’वर रहावे लागले़ शिवाय, नळाला येणाऱ्या पाण्याचेही नियोजन विस्कटले आहे़
गांधी चौकात असलेल्या जलकुंभावर पाण्यासाठी नगरसेवकांमध्ये बाचाबाची होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ शिराढोण येथे व्हॉल्व फोडला की फुटला याबाबत प्रशासनाने मात्र हात वर केले आहेत़ व्हॉल्व फुटला आहे, ते दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे़ लवकरच काम पूर्ण होईल, त्यानंतर पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगितले जात आहे़
मनपा आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, शिराढोण येथे लातूरच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व फुटला आहे़ शनिवारी तो दुरूस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले असून रात्री उशिरपर्यंत काम पूर्ण होईल़ तो व्हॉल्व फोडला की फुटला यावर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला़ मांजरा प्रकल्पावरून मात्र पाणीपुरवठा बंद झाला आहे़ काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल़ मांजरा प्रकल्पावर पाण्यासाठी चढाओढ निर्माण झाली आहे़