जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याला नगरमध्येच फुटल्या अनेक वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 02:15 PM2018-11-17T14:15:58+5:302018-11-17T14:20:13+5:30

निळवंडेतून पाणी सोडल्याच्या तिसऱ्या दिवशीही पाणी नेवाशापर्यंत पोहोचलेले नव्हते. 

The water coming to Jayakwadi is divided into many ways in Nagar | जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याला नगरमध्येच फुटल्या अनेक वाटा

जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याला नगरमध्येच फुटल्या अनेक वाटा

googlenewsNext
ठळक मुद्देजायकवाडीच्या पाण्याची सुरु आहे पळवापळवी निळवंडेतून तीन दिवसापूर्वी सुटलेले पाणी नेवाशातही पोचले नाही

औरंगाबाद :  न्यायालयाच्या आदेशानंतर वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्यात येत आहे; मात्र अहमदनगर जिल्ह्यात कालव्याद्वारे पाण्याला दुसरीकडे वळविण्यात येत आहे. त्यामुळे निळवंडेतून पाणी सोडल्याच्या तिसऱ्या दिवशीही पाणी नेवाशापर्यंत पोहोचलेले नव्हते. 

कालव्याद्वारे पाणी वळविण्यासह बंधाऱ्यातही अडविले जात आहे. कमीत कमी पाणी पुढे जावे यासाठी मध्ये इतक्या ‘वाटा’ निर्माण करून ठेवल्या आहेत की, जायकवाडीत पाणी किती येईल, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. भंडारदऱ्यातून १ हजार ५४७ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडण्यात आले होते, तर निळवंडेतून बुधवारी २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही निळवंडेतून २ हजार क्युसेक विसर्ग सुरूच होता; पण कालव्यातून पाणी दुसरीकडे वळविण्यात येत असल्याने पाणी पुढे सरकत नव्हते.

ओझर बंधाऱ्यातून गुरुवारी पाण्याचा विसर्ग वाढून १४७६ क्युसेक करण्यात आला होता; मात्र शुक्रवारी पुन्हा ७६ क्युसेकने पाणी कमी सोडण्यात आले. त्यामुळे दिवसभरात केवळ १४०० क्युसेक विसर्ग करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, कालवा गुरुवारी रात्री बंद करण्यात येईल व शुक्रवारी नेवासा येथे पाणी पोहोचेल; पण प्रत्यक्षात शुक्रवारी डावा कालवा बंद करण्यात आला नाही. आजही डाव्या कालव्यातून पाणी वाहतच राहिले. ओझर बंधाऱ्यातून सोडण्यात येणारे पाणी खालील बंधाऱ्यांत अडविण्यात येत होते.  कालव्यात सोडलेल्या पाण्यासह ठिकठिकाणी पाण्याच्या चोरीची शक्यताही आहेच. यामुळे प्रत्यक्षात जायकवाडीला किती पाणी येते, हे निश्चित सांगणे कठीण आहे.

‘थर्ड पार्टी आॅडिट’ची मागणी
न्यायालयाचे आदेश असतानाही जायकवाडीच्या हक्काचे पाणी ठरवून दिलेल्या प्रमाणात पोहोचत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आता वरच्या धरणांतून सोडलेल्या पाण्याचे व प्रत्यक्षात जायकवाडीत आलेल्या पाण्याचे थर्ड पार्टी आॅडिट करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. 

Web Title: The water coming to Jayakwadi is divided into many ways in Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.